शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद, रेकॉर्डिंग प्रकरण भोवलं, मोठ्या नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी
शिंदेंच्या शिवसेनेतील मोठा अंतर्गत वाद समोर आला आहे. तालुकाप्रमुखाला हटवण्यासाठी पत्रक काढण्यात आलं आहे, यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार आणि जिल्हाप्रमुखांवर मोठा आरोप केला आहे. नेमकं काय घडलं?

किशोर पाटील, जळगाव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चाळीसगावमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांनी चाळीसगाव येथील तालुकाप्रमुख राहुल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुकाप्रमुख राहुल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख आणि आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. नगरपरिषद निवडणुकीतील दबाव, कथित फोनवरील संवाद आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारावरून हा सगळा बिघाड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पक्षातून हकालपट्टी होताच राहुल पाटील यांचा मोठा संताप पाहायला मिळाला. त्यांनी जिल्हाप्रमुख आणि आमदारांवर आरोप करत पत्रकार परिषदेत कथित फोन संवाद ऐकवलाय. एवढच नाही तर आता आपण या सर्व प्रकरणावरुन थेट शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याकडेच तक्रार करणार असल्याचंही यावेळी सांगितलंय.
नेमका वाद काय?
चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी दबाव टाकला. तसेच आमदार किशोर पाटील यांनी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा गंभीर आरोप राहुल पाटील यांनी केला आहे. यावेळी त्यांनी संबंधित फोनवरील कथित संवादही पत्रकार परिषदेत ऐकवला आहे. पक्षशिस्त केवळ कार्यकर्त्यांनाच लागू आहे का? नेत्यांना पक्षशिस्त नाही का? असा सवाल राहुल पाटील यांनी विचारला आहे. जिल्हाप्रमुख आणि आमदारांविरोधात थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा राहुल पाटील यांची माहिती
राहुल पाटलांचं म्हणणं काय?
मुळात तुमच्यावर (जिल्हाप्रमुख) पक्षशिस्त भंग केल्याची कारवाई झाली पाहिजे. मी शिंदे साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. आजन्म शिवसैनिक आहे. मी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे साहेबांच्या कानावर हा सर्व प्रकार टाकणार आहे. मला तरी वाटतंय त्यांना हा प्रकार माहिती नाही. एकीकडे पक्षशिस्तीची कारवाई करता. ती काय आम्हीच पाळायची आहे का. तुम्ही चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं आहे. नेत्यांना पक्षशिस्तीतून सूट आहे का? असं त्यांनी म्हटलं आहे.