नाशिकमध्ये शिवसेनेचा कार्यक्रम, राऊतांच्या हस्ते उद्घाटन अन् फलकावरून चक्क उद्धव ठाकरेंचाच फोटो गायब!

| Updated on: Oct 23, 2021 | 6:32 PM

नाशिकमध्ये शिवसेनेचा कार्यक्रम, संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन आणि चक्क फलकावरून मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

नाशिकमध्ये शिवसेनेचा कार्यक्रम, राऊतांच्या हस्ते उद्घाटन अन् फलकावरून चक्क उद्धव ठाकरेंचाच फोटो गायब!
नाशिकमध्ये बिटको हॉस्पिटलच्या उद्घाटन फलकावरून चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच फोटो गायब करण्यात आला.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये शिवसेनेचा कार्यक्रम, संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन आणि चक्क फलकावरून मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी तीव्र शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली.

शिवसेना नेते संजय राऊत कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या हस्ते नगरसेवकांच्या विविध कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. यातलाच एक कार्यक्रम आज शनिवारी पार पडला. राऊत यांच्या हस्ते बिटको हॉस्पिटलचा नामकरण सोहळा झाला. मात्र, याप्रसंगी लावण्यात आलेल्या फलकावरून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचाच फोटो गायब झाल्याने शिवसेना पदाधिकरी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांचाच फोटो टाकण्याचा शिवसेना नेत्यांना विसर पडला की काय, असा प्रश्न यावेळी विचारला जात होता. नगरसेवक प्रशांत दिवे यांनी याबाबत सारवासारव करत फलक प्रशासनाने लावल्याचा निर्वाळा दिला. मात्र, नगरसेविका ज्योती खोले यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

राऊतांची फटकेबाजी

शिवसेना नेते संजय राऊत यांची शनिवारची पत्रकार परिषद अपेक्षेप्रमाणे गाजली. त्यांनी थेट नरेंद्र मोदी, अमित शहा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस, किरीट सोमय्या आणि आशिष शेलारापर्यंत साऱ्यांना आपल्या हटके स्टाइलमध्ये उत्तरे दिली. शेवटी ते ज्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आले आहेत, त्याबाबत पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. नाशिक महापौर पदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तेव्हा मात्र, पोटातले पाणी हालू न देता त्यांनी तितक्याच कोड्यात टाकणारे उत्तर दिले. ते म्हणाले, महापौर पदाचा उमेदवार. पक्षात असे काही चालत नाही. तुम्हाला वाटलं होतं का मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे आहेत म्हणून, नाही ना. मग आम्ही पाहू. हा पक्षातला विषय आहे. आमच्याकडे असा संघर्ष वगैरे नाही. कोणी बेचैन नाही, अस म्हणत त्यांनी स्टेजवर मागे पाहत इच्छुकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

नगरसेवकांचे केले कौतुक

शिवसेना विरोधी पक्षात असली, तरी सत्ताधाऱ्यांना लाजवेल असे काम शिवसेनेचे नगरसेवक करत आहेत. भविष्यात निवडणुका आहेत. त्याअगोदर अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करा, अशी विनंती झाली. ते करतो आहे. उद्या सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदार संघात (हे नाव उच्चारताच त्यांना हसू आवरले नाही. कारण भुजबळ-कांदे वाद सर्वश्रुत आहेच. शिवाय कांदेंचे राऊतांनी यापूर्वी केलेले समर्थन.) कार्यक्रम आहे. त्यानंतर मनमाड, दिंडोरी येथे कार्यालयाची उद्घाटने आहेत. शिवसेना पक्षविस्ताराचे काम सुरूच आहे. गटप्रमुख-बुथप्रमुख हा निवडणुकीतील महत्त्वाचा आधार आणि दुवा असतो. पहिल्यापासून शिवसेनेच्या कामाची यंत्रणा ठरलेली आहे, असेही ते म्हणाले.

इतर बातम्याः

नाशिक परिमंडळात उद्या 69 हजार उमेदवार देणार आरोग्य विभागाची परीक्षा; मदतीसाठी हेल्प डेस्क सज्ज

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे अनुदान; नाशिकरांनी येथे साधावा संपर्क