
पुण्यात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे रात्रभर खलबत बघायला मिळाले. सुरूवातीला काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आली आणि त्यानंतर परत घेण्यात आली. हेच नाही तर उदय सामंत तातडीने पुण्याला रवाना झाले असून महत्वाची बैठक होणार आहे. पुण्यात मोठ्या घडामोडी सध्या बघायला मिळत आहेत. काल पुण्यातील 60 हून अधिक इच्छुकांना एबी फॉर्म वाटप करण्यात आले. मात्र, रात्री मुंबईतून वरिष्ठाकडून युतीचा निरोप असल्याने एबी फॉर्म माघारी घेतल्याचे सांगितले जातंय. अखेर शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढणार अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, सेनेने काल स्वबळावर लढण्याची तयारी केली होती. त्यामुळे 60 हून अधिक उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आले. मात्र, आता ऐनवेळी निर्णय बदलल्याने सेनेत पुन्हा नाराजी बघायला मिळतंय.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे पुण्यातील बैठकीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. सर्वांना योग्यवेळी एबी फॉर्म पोहोचवले जातील असेही त्यांनी सांगितले. नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, उदय सामंत दाखल होत आहेत. आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो निरोप असेल त्यानुसार होईल. सर्वांना कल्पना आहेच की, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात अजून काही प्रगती झाल्याचे आम्हाला समजले नाहीये. त्यामुळे आमच्याकडच्या काही उमेदवारांनी फॉर्मही भरले आहेत. मात्र, अजून आम्ही सगळ्यांना एबी फॉर्म दिलेले नाहीयेत. पण आम्हाला जसा निरोप येईल, तसे त्यानुसार आम्ही वेळेत लोकांचे एबी फॉर्म पोहोचवू. त्या पद्धतीने एबी फॉर्मचे वाटप करणार आहोत. उदय सामंत, विजय शिवतारे मी धंगेकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल.
पुढे बोलताना नीलम गोऱ्हे यांनी म्हटले की, काल धंगेकर एनसीपीकडे जाऊन भेटले, त्याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाहीये. ती एक सदिच्छा भेट असावी, असे मला वाटते. पक्षाअंतर्गत राजकीय भूमिकेचा प्रश्न आहे. काल एबी फॉर्म दिले रात्री परत घेतले याबद्दल मी सांगू शकत नाही, असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.