बावनकुळे, तुमची जीभ चुरुचुरू चालतेय, टांगा सांभाळा; संजय राऊत यांची उघड धमकी

उद्धव ठाकरे आणखी बोलले तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा काल बावनकुळे यांनी दिला. संजय राऊत यांनी बावनकुळे यांना त्याच भाषेत उत्तर दिलंय.

बावनकुळे, तुमची जीभ चुरुचुरू चालतेय, टांगा सांभाळा; संजय राऊत यांची उघड धमकी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2023 | 10:49 AM

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना फडतूस हा शब्द वापरल्यानंतर त्याच शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात गंभीर टीका होत आहेत. संजय राऊत यांनी फडतूस नव्हे हे सरकार म्हणजे भिजलेलं काडतूस आहे, अशी टीका केली. हे काडतूस कधीही उडणार नाही. फक्त फुसके बार आहेत. कारण आज त्यांच्याकडे ईडी आणि सीबीआय आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांना इशारा देणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला. २०१९ च्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकिट पक्षश्रेष्ठींनी का कापलं होतं, असा सवाल करत त्याचं कारणही सांगितलं. तसेच तुमची जीभ चुरू चुरू चालतेय, टांगा सांभाळा, असा इशाराही राऊत यांनी दिलाय.

राऊत यांचा दावा काय?

चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकिट २०१९ च्या निवडणुकीत का कापलं, यावरून संजय राऊत यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, ‘ तुम्ही मोठा भ्रष्टाचार केला. दिल्लीपर्यंत प्रकरण गेलं होतं. त्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडू दिलं नाही. तुम्हाला आणि तुमच्या पत्नीलाही तिकिट दिलं नाही. तुम्ही त्यावर आधी खुलासा करा. तुम्ही काय लूट केली होती, वीज खात्यात हे आम्ही बोलायला गेलो तर तुमचं कठीण होईल, असा इशारा राऊत यांनी दिलाय.

‘तुमच्या टांगा सांभाळा’

उद्धव ठाकरे आणखी बोलले तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा काल बावनकुळे यांनी दिला. संजय राऊत यांनी बावनकुळे यांना त्याच भाषेत उत्तर दिलंय. शिवसेनेला धमक्या देऊ नका. तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय, ती फक्त ईडी आणि सीबीआय असल्याने. पण सत्ता असेपर्यंतच बोलू शकाल. महाराष्ट्रात आणि दिल्लीतही तुमची सत्ता नसेल. तोपर्यंत यांच्यासारखे पोपट मिठू मिठू बोलतील. तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. बोला, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.

भिजलेल्या काडतुसांनी…

सुधांशु त्रिवेदी यांनी शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं. तेदेखील भाजपच्या सावरकर गौरव यात्रेत सहभागी होते. यावरून संजय राऊत यांनी घणाघात केला. ते म्हणाले, शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंचा अपमान झाल्यानंतर त्यांची गौरवयात्रा या भिजलेल्या काडतुसांना का काढावी वाटली नाही. ही काडतुसं उडणार नाहीत. आधी शीतल गादेकर आणि संगीता ढवळे या आत्महत्या करून गेल्या… त्यांच्या घरी जाऊन भेटा. महाराष्ट्राला गृहमंत्र्यांची अडचण आहे. हे राज्य करत नाहीयेत, ते सूड घेतायत. ज्या पद्धतीने तुम्ही काल बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाबद्दल भाषा वापरली, ते अवघ्या राज्याने पाहिलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाने महाराष्ट्राला जो स्वाभिमान दिला. तो महाराष्ट्र हे विसरणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.