
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानतंर आता सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. सर्वांचं मत आहे. एकटे लढा. ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात. ठिक आहे. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या. ज्या भ्रमात राहिलो त्यातून बाहेर या. जेव्हा आपली खात्री पटेल आपली तयारी झाली. तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईन, असे उद्धव ठाकरे अंधेरीतील सभेदरम्यान म्हणाले होते. एकीकडे उद्धव ठाकरेंकडून महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत मिळत असताना दुसरीकडे मात्र ठाकरे गटात भूकंपावर भूकंप होताना दिसत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाला ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील जुन्या महिला नेत्याने ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेवक राजुल पटेल असे या महिला नेत्याचे नाव आहे. त्या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजता ठाण्यात त्या पक्षप्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील. याची सुरुवात रत्नागिरीपासून होईल, असा दावा उदय सामंत यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. आता राजुल पटेल या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे.
राजुल पटेल या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या होत्या. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेवक आहेत. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांच्याऐवजी हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली होती.
राजुल पटेल या माजी नगरसेविका म्हणून ठाकरे शिवसेनेत कार्यरत होत्या. त्याशिवाय त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा 2019 साली लढवली होती. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. मात्र आता त्या रामराम करणार असल्याचे बोललं जात आहे.