पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होणं हे देशासाठी शुभसंकेत, संजय राऊतांचा खोचक टोला

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे. मोहन भागवत यांच्या विधानाचा उल्लेख करत राऊत यांनी मोदींची निवृत्ती देशासाठी शुभसंकेत असल्याचे म्हटले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होणं हे देशासाठी शुभसंकेत, संजय राऊतांचा खोचक टोला
sanjay raut pm narendra modi
| Updated on: Jul 10, 2025 | 10:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा ७५ वर्षांचे होत आहेत. त्यामुळे ते निवृत्ती घेणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यातच सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंच्याहत्तरीची शाल जेव्हा अंगावर पडते, तेव्हा याचा अर्थ थांबायचा असतो, असे विधान एका कार्यक्रमात केले होते. त्यावर आता  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभसंकेत आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निवृत्तीवरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतात, त्यांची दाढी पिकलीय, डोक्यावरचे केस उडाले आहेत. जगभ्रमण करुन झालं, सत्तेची सर्व सुख उपभोगली आहेत. आता त्यांना आरएसएसकडून निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल, अशा सूचना येतात, असे संजय राऊतांनी म्हटले.

अनेक नेत्यांवर निवृत्ती जबरदस्तीने लादली

मी याबद्दल एक रोखठोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी हे जेव्हा प्रथम संघ मुख्यालयात प्रथम गेले होते. तेव्हा सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली, या चर्चेचा सारांश टाकला होता. यात नरेंद्र मोदी यांनी जो स्वत:च नियम बनवला आहे किंवा संघाने जो नियम केलेला आहे की ७५ वर्ष झाले की सत्तेच्या पदावरुन निवृत्ती पत्करावी. नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह अशा अनेक नेत्यांवर ही निवृत्ती जबरदस्तीने लादली. आपल्या स्वार्थासाठी आणि आपले मार्ग मोकळे करण्यासाठी हे करण्यात आले, असा आरोप संजय राऊतांनी केला.

हे देशासाठी शुभसंकेत

आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतात, त्यांची दाढी पिकलीय, डोक्यावरचे केस उडाले आहेत. जगभ्रमण करुन झालं, सत्तेची सर्व सुख उपभोगली आहेत. आता जो नियम आपण केलेला आहे की आरएसएसकडून वारंवार त्यांना सूचना दिल्या जात आहेत, तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल. अमित शाहा यांनी निवृत्तीनंतर काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. निवृत्तीनंतर अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. जसे आमचे नानाजी देशमुख यांनी उत्तम कार्य केले. अनेक जण आपपल्या भागात जाऊन सामाजिक कार्य करत असतात. यावर चर्चा करण्याचे कारण नाही. किंबहुना त्या दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येतात हे देशासाठी शुभसंकेत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.