कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं पाहिजे, संजय राऊत संतापले

राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्‍यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे. या संपूर्ण कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं पाहिजे, संजय राऊत संतापले
| Updated on: Sep 28, 2025 | 12:22 PM

आज आशिया चषकात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पीव्हीआर सिनेमागृहात दाखवला जाणार असून या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाने तीव्र विरोध केला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. हे कृत्य देशाच्या सैन्याचा अपमान आहे. त्यामुळे पीव्हीआरने हा सामना दाखवू नये, असे पत्र ठाकरे गटाने दिले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावरून राज्य सरकार आणि पीव्हीआर व्यवस्थापनावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्‍यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे. या संपूर्ण कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे

राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्‍यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे. भारत-पाक सामना पीव्हीआरमध्ये दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस सरंक्षण देत असतील. तर सोनम वांगचूक यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत म्हणून देशद्रोही ठरवले आहे. या संपूर्ण कॅबिनेटला देशद्रोह्याचा आरोपाखाली तुरुंगात टाकायला हवं. या पीव्हीआरवाल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

तो पाहायला जाणाऱ्यांचे डीएनए चेक करायला हवा

सरकार कोणाचं आहे. माय नेम इज खानच्या वेळी आम्ही पडदे जाळले. अजून आमच्या लोकांवर खटले सुरु आहेत. पीव्हीआरला भारत-पाक सामना दाखवला जाणार असेल तर तो पाहायला जाणाऱ्यांचे डीएनए चेक करायला हवा. आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्ष असणार आहे. पण आपल्यातील काही लोक कोडगे असतात आणि कॅबिनेट जर अशा पाकिस्तानला पाठिंबा देणार असेल तर तिथे संघर्ष मोठा होतो. जनता बघणार नाही. आतापर्यंतचा एकही सामना जनतेने पाहिलेला नाही. बहिष्कार घातला आहे. आजचा सामना देखील कोणीही बघणार नाही. पण पीव्हीआर ज्या पद्धतीने हा नालायकपणा करतयं, त्याला भाजप आणि शिंदे गटाचा सपोर्ट आहे. शिंदे गट बाळासाहेबांचे नाव लावतात ना, मग त्यांनी आमचा विरोध आहे, हे स्पष्ट करावं, अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केला.

दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबद्दल विरोध दर्शवला आहे. त्यांनी अलीकडेच झालेल्या पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत, या हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या बलिदानानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे आणि तो सामना सिनेमागृहात दाखवणे हा सैन्याचा अपमान’ असल्याचे म्हटले आहे. या निर्णयावर तातडीने फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मनसेही भारत पाकिस्तान सामना पीव्हीआरमध्ये दाखवण्यास मनाई केली आहे.