राज्यात खराब रस्त्यांमुळे आणखी एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; नाशिक, ठाण्यानंतर पुण्यात महिलेचा मृत्यू
राज्यात खराब रस्त्यांमुळे आणखी एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. नाशिक, ठाण्यानंतर पुण्यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

राज्यात खराब रस्त्यामुळे आणखी एकाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक, ठाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावे लागले आहे. नाशिक, ठाणे या जिल्ह्यानंतर आता पुण्यातही खराब रस्त्याने एकाचा बळी घेतला आहे. पुण्याच्या चाकण MIDC च्या रस्त्यावर एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरली आणि अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर चालक फरार झाला आहे.
चाकण एमआयडीसीमध्ये सिमेंटच्या रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरली. त्यानंतर ही महिला थेट खाली कोसळली. त्याचवेळी मागून आलेल्या अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली 42 वर्षीय महिला दबली गेली. या भीषण अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला. या अपघात प्रकरणी चाकण पोलीस शोध घेत आहे.
नेमकं काय घडलं?
सानवी पांचाळ असे मृत महिलेचे नाव आहे. त्या भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये राहायला होत्या. त्या स्कोडा कंपनीत सिक्युरिटी म्हणून कार्यरत होत्या. त्या ड्युटी संपवून घरी निघाल्या. त्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने रस्ता निसरडा झाला होता. या मार्गावरून त्या दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घरी निघाल्या. परंतु या निसरड्या रस्त्यावरून त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन कोसळल्या. त्याचवेळी मागून आलेल्या अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली आल्या. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर फरार झालेल्या वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेनंतर चाकणमधील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर मृत्यूचे सापळे कायम
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यामुळे टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे कायम असल्याचे समोर आलं आहे. पडघा जवळील कोशिंबी गाव परिसरात महामार्गावर सहा फूट रुंद आणि दोन फूट खोल खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही वाहने विरुद्ध दिशेनेही जाताना दिसत आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. भारंगी नदी पुलाजवळील खड्ड्यात बुलेट आदळून ठाणे महापालिकेचे अग्निशामक जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाला होता. एका जवानाचा बळी गेल्यानंतरही महामार्गावरील खड्डे कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.