नऊ लग्न करणाऱ्या लुटेरी दुल्हनचा खळबळजनक खुलासा; म्हणाली मी हे सर्व…

बीडमधील गाजलेल्या 'लुटेरी दुल्हन' प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. मुख्य आरोपी तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून खळबळजनक खुलासा केला आहे.

नऊ लग्न करणाऱ्या लुटेरी दुल्हनचा खळबळजनक खुलासा; म्हणाली मी हे सर्व...
Luteru Dulhan Case
| Updated on: May 07, 2026 | 10:02 AM

ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या तरुणीला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मुख्य आरोपी असलेल्या तरुणीचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. मी ही नऊ लग्नं स्वखुशीने केली नसून ४ जणांनी माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्याकडून हे कृत्य करवून घेतले, असा खळबळजनक खुलासा या तरुणीने केला आहे.

तरुणीच्या व्हिडीओत नेमकं काय?

माझं नाव भारती गुमस्ते. मला वडील नाहीत. फक्त आई, पाच बहिणी आणि एक भाऊ आहे. माझा भाऊ संगमनेरमधील हॉस्टेलला आहे. माझ्या तीन बहि‍णींची लग्न झाली आहेत. माझ्या घरी फक्त माझी बहीण आणि आई असते. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. या सर्व प्रकरणात माझ्या बहिणीचा, भावाचा किंवा आईचा काहीही संबंध नाही. अर्चना पाटील ही आमच्या गावी राहते. तिचा मुलगा सागर, तसेच गणेश अंदुरे आणि त्याची बायको राधा अंदुरे असे चौघे मिळून मला सतत धमकी द्यायचे. जर तू लग्न केलं नाहीस, तर तुझ्या भावाला मारुन टाकू. मला वडील नाहीत. त्यामुळे मी त्यांच्या धमक्यांना बळी पडले, असे ती म्हणाली.

यांनी जबरदस्ती माझं आठवेळा लग्न लावले. पहिल्या ठिकाणी लग्न केल्यानंतर त्यांनी मला स्वत:हून काढून आणले. पण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी त्यांनी माझे लग्न लावले, त्यांना मी म्हटलं की हे सर्व चांगलं आहे, मला इथे राहायचं राहू द्या. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी मला धमकी दिली की, जर तू आली नाहीस, तर तुझ्या भावाला आम्ही मारुन टाकू. त्यामुळे मग मी घाबरले. त्यानंतर चौथ्या दिवशी हेच मला घ्यायला यायचे. मी ज्यांच्यासोबत लग्न केले, त्यांना संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. पण या चौघांनी काहीही करु दिले नाही. ते फक्त मला धमकी द्यायचे. त्यामुळे मी घाबरले. मी ८ लग्नांमध्ये यांचं पितळं उघड पाडण्यात यशस्वी झाले नाही. मात्र नवव्या लग्नात मी यशस्वी झाले. माझ्या नवऱ्याला इन्स्टावर आयडी मिळाले. त्याने मला सांगितलं की तू सर्व मला खरं खरं सांग, मी तुला काहीही होऊ देणार नाही. मग मी त्यांना सांगितले, असे दावा या तरुणीने केला आहे.

नेमके प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील योगेश शिंदे या तरुणाची फसवणूक झाल्यानंतर हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. योगेशचे लग्न लावून देण्यासाठी एजंटनी ३ ते ३.५ लाख रुपये उकळले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच नवरी दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली.

तपासादरम्यान समोर आले की अशाप्रकारे फसवणूक करणारी टोळी सध्या सक्रीय आहे. ही टोळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशा तरुणांना लक्ष्य करायची ज्यांचे लग्न जमत नाही. मुलीच्या गरिबीचे कारण सांगून मुलाकडच्यांकडून लाखो रुपये उकळले जायचे. लग्न झाल्यावर ही तरुणी काही दिवस सासरी राहायची आणि संधी मिळताच घरातील मौल्यवान ऐवज घेऊन पोबारा करायची. या पैशांतील मोठा हिस्सा एजंट स्वतःकडे ठेवत असत. पोलिसांनी या लुटेरी दुल्हनला बेड्या ठोकल्यानंतर आता तिने व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे.

Follow Us