
राज्यातील दुकाने आणि हॉटेल्स आणि इतर आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली आहे. या संदर्भात राज्य सरकारने अद्यादेश काढला आहे. मद्य विक्री करणारी आणि मद्य पुरवणारी दुकाने वगळून इतर सर्व आस्थापनांना २४ तास खुले ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई हे कधीही न झोपणारे शहर म्हटले जात होते. परंतू आता संपूर्ण महाराष्ट्रातच २४ तास दुकाने सुरु ठेवण्याची मंजूरी देण्यात आली आहे.
राज्यात आता नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर अस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार वगळून इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू ठेवण्याची सूट राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जारी करुन देण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २ (२) मध्ये “दिवस” याची व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरु होणारा चोवीस तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच या अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येतील. मात्र तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुटी देण्यात येईल अशी तरतूद केली आहे.
या अधिनियमाच्या तरतूदींनुसार केवळ परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते, तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित झाल्या आहेत. तसेच उपरोक्त कलम १६ (१) (ख) मधील तरतुदीस अधीन राहून मद्य पुरवठा/विक्री करणा-या आस्थापना वगळून इतर आस्थापना २४ तास सुरु ठेवता येतील असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
मात्र, शासनाने दिनांक १९/१२/२०१७ रोजीच्या अधिसूचनेन्वये राज्यातील विविध क्षेत्रातील मद्य विक्री आणि मद्य पुरविणा-या आस्थापनांच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केलेल्या असल्यामुळे, अशा आस्थापना २४ तास सुरु ठेवता येणार नाहीत असेही राज्य सरकारने अध्यादेशात म्हटले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.