जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची कहाणी भावुक करणारी

जेजुरीच्या खंडोबा गडावर येणाऱ्या भाविकांना आणि नवविवाहित जोडप्यांसाठी आपल्या अनोख्या शैलीत मार्तंड भैरवाची सेवा करतो. त्यांच्यासाठी कुलचार करणारा चिमुकला शुभम वाघरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची कहाणी भावुक करणारी
| Updated on: Sep 12, 2026 | 10:49 PM

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावरून सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. आपल्या गोड आणि खणखणीत आवाजाने गडावर येणाऱ्या हजारो भाविकांची मने जिंकणारा हा चिमुकला म्हणजेच शुभम वाघरी. जेजुरी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, विशेषतः लग्नानंतर कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना आपल्या खास शैलीत तळीभंडारा करून शुभेच्छा देणारा शुभम सध्या इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. गरिबीशी संघर्ष करत अत्यंत आत्मविश्वासाने गडावर सेवा बजावणाऱ्या या बालप्रतिभेचे कौतुक करत सध्या नेटीझन्स त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.

शुभम जेव्हा गडावर येणाऱ्या जोडप्यांना पाहतो, तेव्हा तो अत्यंत आत्मविश्वासाने आणि पारंपरिक लयीत नवविवाहित जोडप्यांच्या सुखी संसारासाठी खंडोबाकडे साकडे घालतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्याची ही बोलण्याची खास लकब आणि चेहऱ्यावरील निष्पाप हावभाव गडावर येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करतात. काही भाविकांनी त्याचे हे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच हे व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला असून शुभम रातोरात स्टार झाला आहे.

सोशल मीडियावर सतत हसतमुख दिसणाऱ्या शुभमच्या खऱ्या आयुष्यातील कहाणी मात्र अत्यंत हलाखीची आणि संघर्षमय आहे. शुभमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्याचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर सेंट्रींगचे (बांधकाम क्षेत्रात) काम करतात. शुभम शाळा सुटल्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळेत तो जेजुरी गडावर येतो. नवविवाहिताच्या सुखी आयुष्यासाठी खंडोबरायाला साकडं घालून भाविकांना पुढच्या आयुष्याचा शुभेच्छा देतो. गडावर येणारे भाविक आनंदी होऊन त्याला जे काही प्रेमाने पैसे देतात, त्यातून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us