छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात, मध्यरात्री कारवाई; जयदीप आपटे अजूनही फरार

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात, मध्यरात्री कारवाई;  जयदीप आपटे अजूनही फरार
| Updated on: Aug 30, 2024 | 10:51 AM

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Chtean Patil Arrested : सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच या दुर्घटनेनंतर विरोधकांनीही आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेनंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठमधील घरी जात चौकशी केली. या चौकशीनंतर आता कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटीलला ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

यानंतर आता चेतन पाटील याला मालवण पोलीस ठाण्यात आणले जाणार असून तिथे त्याची कसून चौकशी केली जाईल. या चौकशीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी आणखी कोणती नवीन माहिती, नवीन खुलासे समोर येतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील काय म्हणाला?

चेतन पाटील हा बांधकाम सल्लागार म्हणून सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम करत होता. त्याने केलेल्या दाव्यानुसार पुतळ्यासाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता. त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन दिले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झालेले नाही, असा दावा चेतन पाटील याने केला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीनं केलं होतं, असं चेतन पाटीलनं स्पष्ट केलं होतं.

जयदीप आपटे फरार

तर दुसरीकडे याप्रकरणातील अन्य आरोपी जयदीप आपटे हा सध्या फरार आहे. जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. जयदीप आपटेची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले असता, त्याच्या घराला टाळे होते. यानंतर पोलिसांनी माहेरी गेलेल्या जयदीप आपटे याच्या पत्नीची चौकशी केली. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट ठाण्यातील जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते.

नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे.