शिंदे-फडणवीसांना अडकवण्याचा डाव? ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ प्रकरणी मोठी अपडेट, प्रवीण दरेकरांची ‘ती’ मागणी मान्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना अडवकण्याचा कट रचल्याच्या चौकशीसाठी ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

शिंदे-फडणवीसांना अडकवण्याचा डाव? पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरणी मोठी अपडेट, प्रवीण दरेकरांची ती मागणी मान्य
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Jan 31, 2025 | 7:48 PM

महाविकासआघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करून अडचणीत आणण्याचा डाव होता. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवा, अशी एक कथित ऑडिओ क्लिप सभागृहात सादर करण्यात आली होती. यात एसीपी सरदार पाटील एका अज्ञात व्यक्तीशी बोलत असून त्यात ते परमबीर सिंह आणि संजय पुनामिया यांच्यार गुन्हा दाखल करून फडणवीस-शिंदे यांना अडकवण्याचे षडयंत्र रचत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशी नेमावी, अशी मागणी केली होती. आता प्रवीण दरेकर यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

आदेशात नेमकं काय?

नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने एक परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकात एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याबद्दल नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना अडवकण्याचा कट रचल्याच्या चौकशीसाठी ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT गठीत केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय या ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करुन फेरतपास चालू करुन फसवणूक केली, अशा आशयाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या पथकात पोलीस उपमहानिरिक्षक राजीव जैन, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे आणि सहायक पोलीस आयुक्त आदिकराव पोळ यांचा समावेश असणार आहे. या विशेष तपास पथकाने चौकशीची कार्यवाही त्वरित पूर्ण करुन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात एक मोठं प्रकरण मांडलं होतं. संजय पांडे नावाच्या अधिकाऱ्याने डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्लॅन करा असे आदेश दिले होते. तसेच संजय पुनामिया यांनी शेखर जगताप, एसीपी सरदार पाटील आणि काही लोकांविरोधात तक्रार केली होती. तो एसीपी सांगतोय, मला भीती वाटते, गुन्हा होऊ शकत नाही मग कसं अडकवता येईल. तरीही डीसीपी पाटील हे पांडेंचे आदेश आहेत, आपल्याला करावे लागते. कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना अडकवता येईल त्यादृष्टीने कारवाई करा, असे व्हिडीओ समोर आले होते. या संभाषणाचे व्हिडीओ प्रवीण दरेकरांनी पेन ड्राईव्हद्वारे आणले होते.