‘आम्ही आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणलं’, शहाजी बापू पाटील यांचं भाजपला प्रत्युत्तर

"आम्ही आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणलं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला होता", असं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.

आम्ही आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणलं, शहाजी बापू पाटील यांचं भाजपला प्रत्युत्तर
आमदार शहाजी बापू पाटील
| Edited By: | Updated on: Oct 17, 2024 | 4:43 PM

मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीने त्याग केला ही एक बाजू असली तरी आम्ही आमच्या आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणलं म्हणूनच भाजपा आज सत्तेत असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या त्याग केल्याच्या वक्तव्याला आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला होता”, असंदेखील शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी आमच्या शिवसैनिकांची भावना आहे. मात्र महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता होण्यावरून मतभेद निर्माण होणार आणि फूट पडणार”, असे म्हणत राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचे शहाजी पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी सर्वजण राजकारणात प्रयत्न करत असतात. मात्र सांगोल्यातील टेंभू म्हैसाळ या पाण्याच्या योजनांना निधी मीच आणल्याचा दावा आमदार शहाजी भाऊ पाटील यांनी केला. सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि माझ्यात चर्चा सुरू आहे लवकरच दीपक आबा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतील अशी मला आशा असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

‘शेकापचे कसलेही आव्हान नाही’

विकासाच्या मुद्द्यावर सांगोल्याची निवडणूक होणार आहे. 5000 कोटींचा निधी आणून मी चौफेर विकास केला आहे. शेकाप हा माझा कायमच विरोधक आहे. त्यामुळे शेकापचे मला कसलेही आव्हान नसल्याचे वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केले. विकासाच्या मुद्द्यावर जनता मला भरभरून मतं देईल आणि मी विजयी होईल, अशी खात्री शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली.

‘सोलापूर जिल्ह्यात आठ जागा निवडून येतील’

“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना, टोल माफी असे निर्णय का नाही घेतले? याचे आधी आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यावे. अर्थव्यवस्थेचा विचार करून, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य कंगाल होईल हा केलेला दावा चुकीचा आहे”, असं शहाजी बापू पाटील म्हणाले. तसेच “सोलापूर जिल्ह्यात महायुतीच्या आठ जागा निवडून येतील”, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला.