Sangola | एकाच व्यासपीठावर शरद पवार-देवेंद्र फडणवीस रमले हास्य-विनोदात

| Updated on: Aug 13, 2023 | 4:36 PM

Sangola | "एकही दिवस सुट्टी न घेणारा, पावणे अकरा वाजता सभागृहात पहिले येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे आमदार म्हणजे आबासाहेब देशमुख हे होते" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sangola | एकाच व्यासपीठावर शरद पवार-देवेंद्र फडणवीस रमले हास्य-विनोदात
Shara pawar-Devendra fadnavis
Follow us on

सोलापूर : आज स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच सांगोल्यात अनावरण झालं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले. परस्परांचे राजकीय विरोधक असलेले दोन्ही नेते या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर एकत्र आले. पुतळ्याच्या अनावरणानंतर एक सभा झाली. या सभेत दोन्ही नेते काय बोलणार? याची उत्सुक्ता लागली होती. दरम्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हास्य विनोदात रमलेले पहायला मिळाले. या कार्यक्रमाला जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते.

शरद पवार यांच्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. त्यावेळी फडणवीस यांनी गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुरक्षा सोडून एसटीने गावाकडे आलेले आमदार म्हणजे आबासाहेब

“गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच अनावरण करण्याचा योग मला आला. आम्ही त्यांना म्हणायचो की, आबासाहेब तुमच्या 100 व्या जन्मदिनाचा कार्यक्रम आम्ही विधी मंडळात साजरा करणार आहोत. पण दुर्देवाने ते आपल्यात नाही याची खंत वाटते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, पण संसारात काही गोष्टी असतात त्यात परिवर्तन होतं नाही. राजकारणातील शाश्वत सत्य म्हणजे आबासाहेब. 1980 साली इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचं सरकार बरखस्त केल्यावर मंत्रिपदाचे सर्व गाडी, सुरक्षा सोडून एसटीने गावाकडे आलेले आमदार म्हणजे आबासाहेब” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकही दिवस सुट्टी न घेणारा आमदार

“महाराष्ट्राच्या दुष्काळाची दाहकता, दुष्काळाच दुखणं आम्हाला गणपतराव देशमुखांमुळे समजले. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकही दिवस सुट्टी न घेणारा, पावणे अकरा वाजता सभागृहात पहिले येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे आमदार म्हणजे आबासाहेब देशमुख हे होते. आबासाहेब म्हणजे वन मॅन आर्मी होते. सभागृहात असताना त्यांनी हात वर केला की सर्वजण शांत व्हायचे” अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

‘संस्था या आपल्या मालकीच्या नसून जनतेच्या आहेत’

“सूतगिरणी ज्याप्रकारे प्रामाणिकपणे चालवली तशी सूतगिरणी कुणीही चालवली नाही. आर्थिक अनियमितता होऊन एकदाही सूतगिरणी बंद पडली नाही. कारण संस्था या आपल्या मालकीच्या नसून जनतेच्या आहेत असे मानून काम करायचे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.