ZP शाळा हाऊसफुल; दोन वर्षांपूर्वी होती केवळ 7 पटसंख्या; मग काय झाला करिष्मा

Z P School Admission Housefull : पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढल्यापासून जिल्हा परिषदेच्या शाळा जणू ओस पडल्या आहेत. अगदी ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे फॅड वाढल्याने मराठी शाळांना कोणी वाली उरले नाही, पण सोलापुरातील या शाळेने हा समज खोडून काढला आहे.

ZP शाळा हाऊसफुल; दोन वर्षांपूर्वी होती केवळ 7 पटसंख्या; मग काय झाला करिष्मा
ॲडमिशन हाऊसफुल
| Edited By: | Updated on: Jun 29, 2024 | 11:46 AM

राज्यात गेल्या काही वर्षांत इंग्रजी शाळांचे पेव फुटले. इंग्रजी शाळांची टूम पार ग्रामीण भागांपर्यंत पोहचली. पालकांचाही इंग्रजी शाळांकडे ओढा वाढला. त्याचा परिणाम सरकारी शाळांवर दिसू लागला. इंग्रजी शाळांतील भपकेबाजपणाला पालक भुलले. ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे फॅड वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओसू पडल्या. काही ठिकाणी पटावरची संख्या तर अवघी पाच आणि सातवर येऊन ठेपली. शिक्षकांच्या समायोजनाची नौबत आली. प्रसंग आला. पण सोलापुरातील या जिल्हा परिषद शाळेने हा समज सपशेल खोडून काढला.

जिल्हा परिषदेच्या शाळेला अच्छे दिन

सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ॲडमिशन हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे. सोलापूरच्या मोहोळ मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश होत नसताना दुसरीकडे झेडपीच्या शाळेत आता ॲडमिशन हाऊसफुल झाले आहेत. प्रवेश फुल झाल्याचा फलकामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळेला अच्छे दिन आलेत.

दोन वर्षापूर्वी अवघी 7 पटसंख्या

दोन वर्षापूर्वी 7 पटसंख्या असलेल्या शाळेत आता 400 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या झाली आहे. हे खरंच सुखद चित्र आहे. पालकांची पावलं पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळू लागल्याने शिक्षकांना पण हत्तीचं बळ आले आहे. त्यांचा उत्साह दुणावला आहे. पण हा चमत्कार एका दिवसात झाला नाही. त्यासाठी शिक्षक, शिक्षण विभागाने कडी मेहनत घेतली. त्यांच्या परिश्रमाला आता फळ आले आहे.

या उपक्रमाचा मोठा फायदा

गुढीपाडवा पट वाढवा, हा उपक्रम चांगलाच गाजला. त्यामुळे विद्यार्थ्यांची पावलं आपसूकचं झेडपी शाळेकडे वळाली. कोविड काळात शिक्षकांनी ऑनलाईन माध्यमांचा आणि इतर माध्यमांचा वापर करुन विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी खंडीत होऊ दिली नाही. त्यांची शाळेविषयीची ओढ कायम ठेवली.

3T हा फॅक्टर महत्वाचा ठरला. टीचर, शिक्षकांची गुणवत्ता महत्वाची ठरली. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. हसत खेळत अभ्यास हा घटक कामी आला. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा अचूक आणि योग्य वापराने विद्यार्थ्यांची अभ्यासातील गती वाढवली. मोबाईलद्वारे, शैक्षणिक ॲपद्वारे शिक्षणाचा वापर वाढला. तर टी म्हणजे ट्रेनिंग या तिसऱ्या घटकामुळे गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण मिळाले. त्याचा परिणाम पटसंख्या वाढीत दिसून आला. आता ही बातमी वाचून स्वस्थ बसू नका, तुमची झेडपी शाळा पण सुंदर करा.