वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा… केळी बागायतदारांचे मोठे नुकसान, या जिल्ह्यांमधील नागरिकांची तारांबळ

Maharashtra Storm Rain : आज राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे केळी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा... केळी बागायतदारांचे मोठे नुकसान, या जिल्ह्यांमधील नागरिकांची तारांबळ
Jalgaon banana farmers in Trouble
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 06, 2026 | 6:29 PM

दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला आहे. आता पुढील काही दिवसांमध्ये तो राज्यभर पोहोचणार आहे. अशातच अकोला जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यांसह पावासाने हजेरी लावली होती. अकोला शहरासह ग्रामीण भागाला आज पावसाने झोडपलं. अशातच हवामान विभागाने आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात आज कोणकोणत्या भागात पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात.

केळी बागांचे मोठे नुकसान

अकोला जिल्ह्यात आज झालेल्या वादळी पावसामुळे ग्रामीण भागात केळी बागांना मोठा फटका बसला आहे. आधीच काही दिवसांपूर्वी झालेल्या जोराच्या वाऱ्यासह पावसामुळं केळी बागा उध्वस्त झाल्या होत्या, त्या संकटातून केळी उत्पादक शेतकरी सावरतचं नाही तर आज देखील ग्रामीण भागात केळी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवलं. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळं केळी बागा जमिनीवर कोसळल्या आहेच. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने शासनाने पंचनामे करावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

वाशिमच्या मानोरा शहरात पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात आज दुपारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या सरी

सिंधुदुर्गात मान्सून सक्रिय होत आहे. दोडामार्गनंतर कणकवलीतील काही भागात जोरदार पाऊस पडला. प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, हुमरठ तसेच सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळाली. या भागातील वीज पुरवठाही खंडित झाल्याचे समोर आले आहे. या पावसामुळे हवेतील उकाडा गायब झाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.

जळगावातही पावसाच्या सरी

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा परिसरात विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. दोन महिन्यांपासून नागरिक उष्णतेने हैराण झालेले होते, मात्र आता पडलेल्या या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी वादळी वारा आणि गारपीटीमुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभ राहिलं आहे.

 

Follow Us