
आज बुधवार ११ जून २०२५ रोजी रात्री आकाशात ‘स्ट्रॉबेरी मून’ पाहायला मिळणार आहे. यावेळी चंद्र लाल, चमकदार, रंगीबेरंगी आणि मोठा दिसणार आहे. याला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे नाव देण्यात आले आहे. हा यंदाच्या वर्षातील सर्वात तेजस्वी चंद्र असणार आहे. आता यावर खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी चंद्र स्ट्रॉबेरीसारखा लाल रंगाचा दिसणार नाही असे स्पष्टीकरण दिले.
जून महिन्यातील पौर्णिमा असली चंद्राला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे संबोधले जात असले तरी तो स्ट्रॉबेरीसारखा लाल रंगाचा दिसणार नाही, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. लोकांमध्ये ‘स्ट्रॉबेरी मून’ म्हणजे चंद्र लाल दिसणार, असा गैरसमज आहे. मात्र हा गैरसमज दा.कृ.सोमण यांनी दूर केला आहे. दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात पाश्चिमात्य देशात स्ट्रॉबेरीचे पीक जास्त येते. त्यामुळे पाश्चात्त्य शेतकरी जून महिन्यातील पूर्ण चंद्राला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे म्हणतात.
चंद्राच्या पौर्णिमेला दिलेली ही नावे शास्त्रीय नसून, ती त्या-त्या ऋतू आणि नैसर्गिक घटनांवर आधारित आहेत. चंद्राच्या रंगाचा या नावाशी काहीही संबंध नाही. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला असलेल्या विशेष नावांची माहिती दिली. अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या पंचांगामध्ये ही नावे देण्यात आली आहेत.
एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्लू मून’ म्हणतात, असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले. आजच्या चंद्राला ‘स्ट्रॉबेरी मून’ हे नाव असले तरी, आज चंद्र नेहमीसारख्याच पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसेल. तो लाल रंगाचा दिसणार नाही. आज दुपारी १ वाजून १४ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त झाली आहे. त्यामुळे रात्री आज पौर्णिमा नाही. चंद्रोदयाची वेळ नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७ वाजून ३१ मिनिटे असून, उद्या सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी चंद्र अस्त होईल.
आज चंद्राची क्रांती २८ अंश दक्षिणेला आहे, म्हणजे चंद्र दक्षिण दिशेला जास्तीत जास्त जाणार आहे. याचा अर्थ चंद्र दक्षिण आणि पूर्वेच्या मध्ये उगवेल, पण यामुळे त्याच्या दिसण्यात किंवा रंगात कोणताही फरक पडणार नाही, असे सोमण यांनी सांगितले. तसेच, आज ‘सुपर मून’ सारखी स्थिती नाही, त्यामुळे चंद्र १८% मोठा दिसणार नाही, तो नेहमीसारखाच दिसेल. थोडक्यात, ‘स्ट्रॉबेरी मून’ हे नाव फक्त जून महिन्यातील स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाशी संबंधित असून, चंद्राच्या रंगाशी त्याचा काहीही संबंध नाही.