दांडीया क्वीन फाल्गुनी पाठकच्या दांडियात मुस्लिमांना बंदी, भाजप आमदाराची कठोर भूमिका
Garba : नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वाद सुरु आहेत. यावर आता भाजप आमदाराने कठोर भूमिका घेतली आहे. बोरीवलीमध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या गरबा उत्सवात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

Garba : विश्व हिंदू परिषदेने (VHP) आता नवरात्रीदरम्यान गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू असलेली चर्चा अजूनही सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बोरीवलीमध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या गरबा उत्सवात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या गरबा उत्सवात डांडिया गायिका गीता रबारी आणि गरबा क्वीन फाल्गुनी पाठक परफॉर्मन्स करणार आहेत. बोरीवलीतील बिगेस्ट गरब्याचे आज भूमिपूजन आणि प्रेस कॉन्फरन्स पार पडली. यावेळी भाजप आमदाराने कठोर भूमिका बजावली आहे.
नुकताच पार पडलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भाजप आमदार संजय उपाध्याय, आमदार मनिषा चौधरी आणि माजी खासदार गोपाल शेट्टी उपस्थित होते. यावेळी त्यांनी गरब्याचा उत्साह आणि गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
मुस्लिम प्रवेशावर बोलताना माजी भाजप खासदार गोपाल शेट्टी यांनी म्हटलं की, जर कोणी टिळा लावून येत असेल तर येऊ शकतो. जेव्हा आम्ही म्हणतो की मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते, तर टिळा त्यांनी लावावा. जेव्हा आम्ही त्यांच्या ईदला जातो तेव्हा टोपी घालतो…’ असं खासदार म्हणाले.
तर भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुस्लिम प्रवेशावर कठोर भूमिका घेत म्हटलं, यावेळी गरब्यात मुस्लिमांचा प्रवेश नाही. ज्याला यायचं आहे त्याने आपली पत्नी, बहीण आणि मुलीसोबत यावं, टिळा लावावा आणि देवीची पूजा करावी. सनातनवर विश्वास ठेवा आणि मग या, ही लव्ह जिहादची जागा नाही., तर आयोजक संतोष सिंह यांनी सांगितलं, यावेळी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, आधार कार्ड तपासूनच प्रवेश दिला जाणार आहे.
आमदार मनिषा चौधरी यांनी सांगितले की, या गरब्यात येण्यासाठी आता मेट्रो आहे आणि हायवेने जाण्यासाठीही हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आपण मेट्रो पकडून गीता रबारीच्या गरबा महोत्सवाला येऊ शकता, नऊ दिवस गीता रबारी आणि 20 तारखेला फाल्गुनी पाठक खेळणार आहेत, त्याचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा…. गणेशोत्सवानंतर सर्वत्र आता गरब्याचा उत्साह दिसून येत आहे.