सुधीर मुनगंटीवार ‘या’ कार्यक्रमाला आलेच नाहीत, पण लग्नसोहळ्यात दिसले, कार्यकर्ते नाराज, नांदेडकरांमध्ये चर्चा

| Updated on: Mar 31, 2023 | 1:40 PM

मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या कार्यक्रमाला मंत्र्यासह अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी गैरहजेरी लावली त्यामुळे हा सोपस्काराचा थाट कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय.

सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला आलेच नाहीत, पण लग्नसोहळ्यात दिसले, कार्यकर्ते नाराज, नांदेडकरांमध्ये चर्चा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राजीव गिरी, नांदेड : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) नांदेडमध्ये (Nanded) असूनही एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला आलेच नाही. मुनगंटीवारांप्रमाणेच इतरही मंत्री आणि नेत्यांनी मराठवाड्यातल्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कार्यक्रम होता मराठवाडा मुक्तीसंग्राम सोहळ्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उदघाटन सोहळ्याचा. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेडमध्ये असूनही अर्जापुर इथल्या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली. जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक यांच्यासह एकही लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाकडे फिरकला नाही. नेते आणि अधिकाऱ्यांची ही अनास्था पाहून हा सोहळा कशासाठी आयोजित केला होता, हाच प्रश्न विचारला जातोय. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उरकण्यात आलाय.

नुसते सोपस्कार कशासाठी?

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित नांदेडमध्ये आजपासून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती असणार होती, त्यासोबतच हिंगोली लातूरच्या खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच निमंत्रण पत्रिकेवर जिल्ह्यातील अकरा आमदारांची देखील नावे टाकली होती. यापैकी केवळ नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि देगलूर बिलोलीच्या तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे उदघाटन उरकण्यात आले. इतकंच काय तर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, 4 जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही कार्यक्रमाला गैर हजेरी अनेकांना खटकली.

मुनगंटीवार यांच्या गैरहजेरीने चर्चा

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेडचे जावई आहेत. ते कालपासून त्याच्या सासुरवाडीत अर्थात नांदेडमध्ये सध्या पाहुणचार घेतायत. सासुरवाडीत असलेल्या वाढदिवस आणि लग्न सोहळ्याला त्यांनी हजेरी लावलीय. मात्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी लावण्यास मुनगंटीवार यांना वेळ मिळाला नाही याचे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. मग निमंत्रण पत्रिकेवर केवळ सोपस्कारासाठी नाव टाकले होते का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.

राजुरा तालुक्याचं वैशिष्ट्य काय?

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ज्या चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात, त्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका पूर्वी निजामाच्या हैद्राबाद संस्थानाच्या अंतर्गत समाविष्ट होता. प्रांत रचनेत राजुरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात गेला असला तरीही त्या तालुक्यात आजही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो तरीही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन सोहळ्याला मुनगंटीवार यांनी वेळ दिला नाही याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलय.

14 स्वातंत्र सैनिकांचा सन्मान

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षांचा उदघाटन सोहळा आज बिलोली तालुक्यातील अर्जापुर इथे घेण्यात आला. हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करत या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात हयात असलेल्या चौदा स्वातंत्र सैनिकांचा या उदघाटन सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रताप पाटील, आमदार राम पाटील तसेच उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्यासह काही माजी आमदारांची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार श्रीकांत निळे यांनी कार्यक्रम यशस्वी केला, मात्र मान्यवरांची अनुपस्थिती अनेकांना खटकलीय.

कार्यक्रम अर्जापुरलाच का घेतला ?

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील पहिले हुतात्मे गोविंद पानसरे हे बिलोली तालुक्यातील अर्जापुरचे रहिवाशी होते. हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यात निजामाच्या रजाकारांनी पानसरे यांची अर्जापुर इथे हत्या केली होती. हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील पानसरे हे पहिले शहीद होते, त्यामुळेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांचा शुभारंभ सोहळ्याचे उदघाटन अर्जापुर इथे करण्यात आले. मात्र या उदघाटनाच्या कार्यक्रमाला मंत्र्यासह अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी गैरहजेरी लावली त्यामुळे हा सोपस्काराचा थाट कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय.