निकाल लागताच सुधीर मुनगंटीवार जाम भडकले, स्वत:च्या पक्षाला सुनावलं, खदखद काढली बाहेर!

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाला जबर धक्का बसला आहे. येथे बहुसंख्य नगरपरिषदा भाजपाच्या हातातून निसटल्या आहेत. येथे काँग्रेस पक्षाची सरशी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सुधीर मुनगंटीवार यांनी आपली खदखद व्यक्त केली.

निकाल लागताच सुधीर मुनगंटीवार जाम भडकले, स्वत:च्या पक्षाला सुनावलं, खदखद काढली बाहेर!
sudhir mungantiwar and devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 21, 2025 | 3:52 PM

Chandrapur Nagar Parishad Election Result : राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीची सरशी झाली आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत एकंदरीत महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्षच वरचढ दिसत असले तरीही काही ठिकाणी मात्र या तिन्ही पक्षांना जबर धक्का बसला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. काही ठिकाणी काँग्रेस पक्षाने आपली सत्ता कायम ठेवली आहे. दरम्यान, सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील निकालाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. येथे भाजपाला जबर धक्का बसला आहे. येथे अकरापैकी बहुसंख्य नगरपरिषदा भाजपाच्या हातातून निसटल्या आहेत. त्यामुळेच आता भाजपाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. त्यांनी मला मंत्रिपद दिलं नाही. विदर्भातल्याच चारही जिल्ह्यांमधून एकाही नेत्याला मंत्रिपद दिलेलं नाही, अशीही खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांनी आपली खदखद बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

चंद्रपूर जिल्ह्यातील अकरापैकी बहुतांश नगरपरिषदांमध्ये भाजपाचा पराभव झालेला आहे. हीच बाब लक्षात घेता भाजपाच्या पराभवाचे नेमके कारण काय? असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. या पराभवाचे कारण सांगताना मुनगंटीवार यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. विदर्भातील गडचिरोली भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यातील एकाही नेत्याला मंत्री केलेले नाही, अशी खंत मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली आहे. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता केलं. पण भाजपाने मला तर मंत्रिपद दिलंच नाही, पण चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांतून कोणालाही मंत्रिपद दिले नाही. शिवाय आम्ही बाहेरच्या लोकांना पक्षात प्रवेश देतोय. त्याचा परिणाम नक्कीच मतदारांवर झाला, असे मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांचा निकाल काय?

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 11 नगरपरिषदांपैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा विजय झाला. भाजपाचा दोन नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा विजय झाला.

भद्रावती नगराध्यक्ष : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी विजयी

वरोरा नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी

मूल नगराध्यक्ष : काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी

राजुरा नगराध्यक्ष – काँग्रेसचे अरुण धोटे विजयी

गडचांदूर नगराध्यक्ष – अपक्ष (भाजप बंडखोर) निलेश ताजने आघाडीवर

नागभीड नगराध्यक्ष : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी

ब्रम्हपुरी नगराध्यक्ष : काँग्रेसचे योगेश मिसार विजयी

चिमूर नगराध्यक्ष : भाजपच्या गीता लिंगायत विजय

घुग्गुस नगराध्यक्ष : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के आघाडीवर

बल्लारपूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अलका वाढई आघाडीवर

भिसी (नगरपंचायत) नगराध्यक्ष : भाजपचे अतुल पारवे विजयी