उद्धव ठाकरेंच्या एका मागणीमुळे इंडिया आघाडी फुटणार? भाजप नेत्याचा सर्वात मोठा दावा, म्हणाला ज्या दिवशी…

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरून इंडिया आघाडीवर टीका केली आहे. पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित करणे म्हणजे मध्यरात्री सूर्य उगवण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंच्या एका मागणीमुळे इंडिया आघाडी फुटणार? भाजप नेत्याचा सर्वात मोठा दावा, म्हणाला ज्या दिवशी...
india alliance
| Updated on: Jun 09, 2026 | 9:54 AM

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित करणे म्हणजे भर मध्यरात्री सूर्य उगवण्यासारखे असंभव आहे. ज्या दिवशी या आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर होईल, त्याच दिवशी ही आघाडी फुटेल. म्हणूनच आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे यांनी हा बॉम्ब टाकून आघाडीच्या अंतर्गत वादाला तोंड फोडले आहे,” असा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीने आगामी निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा आधीच स्पष्ट करावा, अशी मागणी केली होती. यावर नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी थेट भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंच्या मागणीमुळे आघाडी फुटणार

इंडिया आघाडीमध्ये अनेक नेते स्वतःला पंतप्रधानपदाचे दावेदार मानतात. अशा परिस्थितीत तिथे एकमत होणे शक्यच नाही. उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएमध्ये (NDA) येतील की नाही, हा वेगळा विषय आहे. मात्र, त्यांनी केलेली ही मागणी म्हणजे इंडिया आघाडीच्या विघटनाची सुरुवात आहे. त्यांनाही ठाऊक आहे की चेहरा घोषित करताच आघाडीत बिघाडी होणार, तरीही त्यांनी हा राजकीय बॉम्ब टाकला आहे, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

राहुल गांधींवर खोचक टीका

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही उपरोधिक टीका केली. “राहुल गांधी कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत, ही जणू देवाचीच इच्छा आहे,” असे म्हणत त्यांनी यासंदर्भातील एक राजकीय विनोद ऐकवून विरोधकांना टोमणे मारले. इंडिया आघाडीकडे ना कोणती स्पष्ट नीती आहे ना कुठला नेता, त्यामुळे ही आघाडी केवळ भाजपविरोधासाठी एकत्र आली आहे, असा पुनरुच्चार मुनगंटीवार यांनी केला.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नुकतंच इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेक सूचना केल्या होत्या. तसेच काही मागण्याही केल्या आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा आधी ठरवा, आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार आहोत,” अशी भूमिका घेतली होती. शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांना हा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी निवडणुकीनंतर चेहरा ठरवू, असे सांगून हा विषय टाळला होता. विरोधकांमधील याच अंतर्गत मतभेदांवर आता सुधीर मुनगंटीवार यांनी बोट ठेवत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे.

Follow Us