Sugar Price: यंदा दिवाळीचा फराळ महागणार, साखरेचे दर शंभरी पार जाणार?; केंद्राचे कडक नियम

Sugar Price: येत्या दिवाळीपर्यंत साखरेचे दर शंभर रुपये प्रतिकिलो वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या खुल्या बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर पोहोचले आहेत. याबाबत केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना काय निर्देश दिले, ते जाणून घ्या..

Sugar Price: यंदा दिवाळीचा फराळ महागणार, साखरेचे दर शंभरी पार जाणार?; केंद्राचे कडक नियम
साखर
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2026 | 9:27 AM

Sugar Price: दिवाळीचा सण जवळ येत असताना साखरेच्या दराबाबत चिंता वाढू लागली आहे. सध्या खुल्या बाजारात साखरेचा दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास साखरेचे दर 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून व्यापाऱ्यांच्या साठ्यावर लक्ष ठेवलं जात आहे. राज्यात दर महिन्याच्या सरासरी 3 लाख टन साखरेची गरज असते. सध्या राज्यात सुमारे 17 ते 18 लाख टन साखर शिल्लक असल्याचं साखर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तात्काळ साखरेची कमतरता नसली तरी आगामी काळातील वाढती मागणी आणि इतर राज्यांना होणारा पुरवठा यामुळे बाजारातील दरांवर दबाव येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून दक्षिणेकडील काही राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर साखरेचा पुरवठा केला जातो. त्यामुळे राज्यातील उपलब्ध साठ्यावर अतिरिक्त दबाव निर्माण होऊ शकतो. विशेषत: दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि इतर खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून साखरेचा अनावश्यक साठा करून दर वाढवले जाणार नाहीत, याची काळजी प्रशासन घेत आहे.

व्यापाऱ्यांसाठी केंद्राचे कडक नियम

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत साठा मर्यादेते निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार व्यापाऱ्यांना एका ठिकाणी एकावेळी 400 टनांपेक्षा जास्त साखर साठवता येणार नाही. तसंच साखर खरेदी केल्यानंतर ती 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवण्यासही निर्बंध आहेत. दरम्यान राज्याला अतिरिक्त साखर कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात मागणी वाढली तरी बाजारात पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

राज्यातील साखरेची स्थिती

  • 18 लाख टन साखर सध्या उपलब्ध
  • 3 लाख दरमहा लागणारी साखर
  • 20 लाख टन देशाला दरमहा गरज

साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात 17 ते 18 लाख टन साखरेचा साठा उपलब्ध आहे. तसंच 15 ऑक्टोबरपासून साखर गाळप हंगाम सुरू होणार असल्याने पुढील काळात नवीन साखर बाजारात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सध्या साखरेचा पुरेसा साठा असला तरी दिवाळीच्या काळात दर वाढू नयेत यासाठी प्रशासनाला साठेबाजीवर विशेष लक्ष ठेवावं लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us