चालकाची मस्ती प्रवाशांच्या जीवावर, मुंबई-गोवा हायवेवर बस उलटली; 38 जखमी, 2 प्रवाशांचा जागीच अंत

नागोठणे जवळील सुकळी खिंडीत मुंबई-गोवा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला असून २ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. चालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

चालकाची मस्ती प्रवाशांच्या जीवावर, मुंबई-गोवा हायवेवर बस उलटली; 38 जखमी, 2 प्रवाशांचा जागीच अंत
bus accident
| Updated on: Apr 03, 2026 | 7:45 AM

मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नागोठणे जवळील सुकळी खिंडीत शुक्रवारी पहाटे एका खाजगी बसला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नसून चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचा खळबळजनक आरोप प्रवाशांनी केला आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी ही खाजगी लक्झरी बस (Private Bus) सुकळी खिंडीतून जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. खिंडीतील तीव्र वळणावर चालकाचा वेगावरचा ताबा सुटला आणि बस थेट उलटली. बस उलटताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि गोंधळ निर्माण झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

प्रवाशांचा संताप

या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी चालकाच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रवास सुरू झाल्यापासूनच चालक अतिशय वेगाने आणि नागमोडी पद्धतीने बस चालवत होता. अनेक प्रवाशांनी त्याला टोकले, तरीही त्याने दुर्लक्ष केले. धक्कादायक बाब म्हणजे, काही प्रवाशांनी बस धावत असतानाच RedBus या पोर्टलवर चालकाच्या बेदरकार ड्रायव्हिंगबाबत ऑनलाईन तक्रारही नोंदवली होती. दुर्दैवाने, या तक्रारीची दखल घेण्यापूर्वीच हा भीषण अपघात घडला.

बचावकार्य आणि वैद्यकीय उपचार

या अपघातानंतर नागोठणे पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर जखमी असलेल्या ९ ते १० प्रवाशांना तातडीने कळंबोली येथील एमजीएम (MGM) रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात मृत पावलेले दोन प्रवासी नेमके कुठले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

महामार्गावरील सुरक्षा धोक्यात?

दरम्यान सुकळी खिंडीचा परिसर हा अपघातांसाठी संवेदनशील मानला जातो. त्यातच खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकांकडून होणारी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दोषी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. नागोठणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. लवकरच या बसची तांत्रिक तपासणी देखील केली जाणार आहे.

Follow Us