सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच संजय राऊतांकडून धोक्याचा इशारा, म्हणाले अजित पवारांची राष्ट्रवादी…

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रफुल्ल पटेलांच्या वाढत्या प्रभावाबद्दल इशारा दिला आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच संजय राऊतांकडून धोक्याचा इशारा, म्हणाले अजित पवारांची राष्ट्रवादी...
sanjay raut sunetra pawar
| Updated on: Feb 01, 2026 | 10:24 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवारांचे अभिनंदन केल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपच्या घराणेशाहीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. त्यांनी महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. मोदी नेहमीच ठाकरे आणि गांधी घराण्यावर घराणेशाहीचा आरोप करत चिखलफेक करत असतात. पण आता सुनेत्रा पवारांचे अभिनंदन करून त्यांनी स्वतःला त्या आरोपातून मुक्त केले आहे. आता यापुढे मोदींनी किमान घराणेशाहीवर तरी बोलू नये, असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या पक्षाबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी पक्षांतर्गत राजकारणावर भाष्य केले. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि भाजपचा विषय आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचे आमदार आहेत. तटकरे-पटेल यांनी हा निर्णय घेतले आहेत, असे सर्व म्हणतात. शेवटी त्यांचा पक्ष आहे. अजित पवारांचा पक्ष हा कष्टकरी आणि रांगड्या लोकांचा पक्ष आहे. शरद पवारांप्रमाणेच अजित पवारांनीही महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड केली नाही. मात्र, आता हा पक्ष प्रफुल्ल पटेलांच्या प्रभावाखाली जाण्याची भीती संजय राऊतांनी व्यक्त केली.

हा पक्ष भोसले, पाटील, मोहिते आणि कांबळेंचा आहे. तो पटेलांचा होऊ नये याची काळजी सुनेत्रा पवारांनी घेतली पाहिजे. पक्षाची सूत्रे मराठी चेहऱ्यांकडेच राहणे ही काळाची गरज आहे, अन्यथा महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात येईल, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपवर दुसऱ्याच्या खांद्याचा वापर केल्याचा आरोप

भाजपच्या सध्याच्या रणनीतीवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, भाजप स्वतःच्या जोरावर राजकारण करण्यास असमर्थ ठरत आहे. भाजपची छाती आणि खांदे आता पिचले आहेत. त्यांना स्वतःच्या बळावर काही करता येत नाही, म्हणूनच ते दुसऱ्यांचे खांदे वापरून महाराष्ट्रातील निष्ठावान व्यक्ती, संस्था आणि पक्षांचा काटा काढण्याचे काम करत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.