धक्कादायक ! प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परंड्यात ‘अंधश्रद्धे’चा प्रवेश; कोण होतं टार्गेट ?

परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जनशक्ती नगरविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांना लक्ष्य करत धक्कादायक जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कब्रस्तानात नेत्यांच्या फोटोला सुया टोचून काळ्या कपड्यात बांधलेले आढळले. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणुकीच्या प्रचाराला वेगळे वळण लागले आहे.

धक्कादायक ! प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परंड्यात अंधश्रद्धेचा प्रवेश; कोण होतं टार्गेट ?
Paranda election
| Updated on: Dec 01, 2025 | 2:54 PM

राज्यात सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्राचर अंतिम टप्प्यात आला आहे. परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचारही शेवटच्या टप्प्यात असचानाच तिथे जादूटोण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील खाँजा खलील दर्गाह कब्रस्तानात जनशक्ती नगरविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोठी खळबळ माजली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत बैठका घेतात, कॉर्नर सभा घेऊन भेटीगाठी करत असताता. मात्र हे सर्व प्रयत्न सुरू असतानाच आता, दुसरीकडे अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. पण हा सर्व प्रकार कोणी केला, त्यामागचा उद्देश काय आहे, हे तर अद्याप स्पष्ट झालेलं नाही, कोणातं नावही अजून समोर आलेलं नाही.

जादूटोण्यात कोण होतं टार्गेट ?

मिळालेल्या माहितीनुसार, जनशक्ती नगरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील, 20 नगरसेवक, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, रणजित ज्ञानेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, ॲड. नुरोद्दीन चौधरी, जमील पठाण, ॲड. जहीर चौधरी या सर्व प्रमुख नेत्यांचे आणि उमेदवारांच्या फोटोला सुया, दाभण टोचून ठेवण्यात आलं होतं. तसेच ते काळ्या कपड्यांमध्ये बांधून खाँजा खलील दर्गाह कब्रस्तानात ठेवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली असून भीतीचेही वातवरण आहे.

विकासाच्या मुद्द्याऐवजी भीतीचं वातावरण

परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा शिवसेना (शिंदे गट) आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. दोन्ही पक्षांकडून गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार सुरू होता. मात्र, आत जादूटोण्याचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने परंडा शहरात संपूर्ण वातावरण भीतीदायक व गंभीर बनले आहे. नागरिक दहशतीखाली आहेत. हे नेमकं कोणी केलं याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.