पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अखेर सत्य समोर, सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं, म्हणाल्या, पवार साहेबांनी…
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनकरण होणार असे बोलले जात होते. तसा प्रस्तावही काँग्रेसकडून पाठवण्यात आल्याचाही दावा केला जात होता. यावरच आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिले आहे.

NCP Merger With Congress : एकीकडे राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे तसा प्रस्तावही काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या पक्षाला मिळाला असल्याचा दावा केला जात होता. असे असताना आता याच चर्चेवर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वकाही सांगितलं आहे. त्यांनी विलीनीकरणाच्या या चर्चेवर थेट भाष्य केलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय सांगितलं?
सुप्रिया सुळे यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. आमदार, खासदार किंवा अन्य कोणाशाही कोणीच संपर्क केलेला नाही. आम्हीदेखील कोणाशी संपर्क केलेला नाही, असे सुळे यांनी थेट सांगून टाकले. तसेच विलीनीकरणाची ही चर्चा कुठून सुरू झाली, चर्चा कोणी सुरू केली याची कल्पना मला नाही, असेही सुळे म्हणाल्या.
बैठक दोघींमध्येच झाली त्यामुळे…
तृणमूल काँग्रेस पक्षातील बंडकोरी आणि या पक्षाचे कथित काँग्रेस पक्षातील विलीनीकरण यावरही त्यांनी भाष्य केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाविषयी नेमकं काय सुरू आहे, याची मला कल्पना नाही. कारण तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची बैठक ही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झाली. या बैठकीत त्या दोघीच होत्या. त्यामुळे त्यांनी माध्यमांना विलीनीकरणाविषयी काही सांगितलेले आहे की नाही, याची मला कल्पना नाही. विलीनीकरणाबाबत माझ्याही काही वाचनात आलेले नाही, असे सुळे म्हणाल्या.
शरद पवारांनीही प्रस्ताव दिला नाही
कोण कुणाच्या संपर्कात नाहीये याची मला कल्पना नाही. शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शरद पवार यांनीदेखील कोणालाही प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी थेट स्पष्ट केले.
महागाई, बरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार, पेपरफुटी हे प्रश्न गंभीर बनले
देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता विलीनीकरण हा एक पर्याय असू शकतो, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. याचे उत्तर देताना, “देशाची आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती खूप वाईट का आहे. सध्या राजकारण करायची वेळ नाही. सध्या देश वाचवण्याची गरज आहे. महागाई, बरोजगारी, प्रचंड भ्रष्टाचार, पेपरफुटी हे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यामुळे एकमेकांशी भांडत करत बसायचे की हे प्रश्न सोडवायचे याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.