Surat Bus Accident : 18 तास उलटले… अस्वस्थता, संताप आणि संभ्रम… केवळ एकाचीच ओळख पटली; नातेवाईकांचा संयम सुटला

सुरत बस अपघाताला १८ तास उलटले तरी ७ पैकी फक्त एका मृतदेहाची ओळख पटली आहे. जळालेल्या मृतदेहांमुळे डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे, ज्यामुळे नातेवाईकांमध्ये संताप, अस्वस्थता आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

Surat Bus Accident : 18 तास उलटले... अस्वस्थता, संताप आणि संभ्रम... केवळ एकाचीच ओळख पटली; नातेवाईकांचा संयम सुटला
सुरत बस अपघात
| Updated on: Jun 03, 2026 | 11:58 AM

सुरतच्या उवा गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताला 18 तास उलटून गेले आहेत. या अपघातात बसमधील सातही प्रवाशी जिवंत जळाल्याने मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेने अख्खा देश हादरून गेला आहे. हे सर्व प्रवाशी महाराष्ट्रातील आहेत. त्यातील एका प्रवाशाचीच ओळख पटली आहे. 18 तास उलटले तरी इतर प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये संताप पसरला आहे. आमच्या नातेवाईकांचे मृतदेह कधी मिळणार? असा आक्रोश नातेवाईकांमधून होत आहे. पण कोणतीच माहिती मिळत नसल्याने नातेवाईकांमध्ये अस्वस्थता, संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे.

सुरतच्या उवा गावाजवळ काल बस दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील केवळ एका मृतदेहाची ओळख पटली आहे. सहा मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधून नातेवाईकांनी गुजरातच्या बारडोलीत धाव घेतली आहे. इथे येताच शवविच्छेदनगृह आणि रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मृतदेहांची शोधाशोध सुरू केली आहे. डीएनए अहवालासाठी किती वेळ लागणार याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्यता आली नाही. त्यामुळे नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मृतदेह कधी मिळणार?

अपघातानंतर 18 तास उलटूनही अनेक कुटुंबांना आपल्या नातेवाईकांचा ठावठिकाणा नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून हेल्पलाइन वा समन्वय यंत्रणा नसल्याची तक्रार नातेवाईक करत आहेत. माहिती अभावी नातेवाईकांमध्ये संताप, अस्वस्थता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. मृतदेह कधी मिळणार? असा संतप्त सवाल नातेवाईक करत आहेत. अपघाताच्या वेदनेपेक्षा अनिश्चिततेची यातना अधिक असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

मृतदेह गावात

दरम्यान, बारडोली गावात बसच्या भीषण अपघातातील मयत बस चालकाचा मृतदेह कुऱ्हा पानाचे गावी दाखल झाला आहे. घनश्याम राघो बरकले असे मयत 42 वर्षीय बस चालकाचे नाव आहे. सुरत येथे भीषण अपघातात जळून खाक झालेली बस ही जळगावच्या जामनेर बस आगाराची होती. यात बस चालकाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळीच मयत चालक घनश्याम बरकले यांचा मृतदेह त्यांच्या गावी दाखल झाला. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी मयत बस चालक घनश्याम बरकले यांची पत्नी मुलं तसेच आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.

दरम्यान, कालच्या घटनेमुळे जळगाव, धुळ्यात शोककळा पसरली आहे. जळगावच्या जामनेर बस आगारात आज शेड्युल बंद करण्यात आले. भुसावळ, मुक्ताईनगर आणि जामनेर आदी ठिकाणी शोकाकूल वातावरण आहे. 13 वर्षापासून आम्ही बस सेवेत कार्यरत आहोत. माझा सहकारी अचानक गेल्याने मोठं दुःख कोसळलं आहे, असं एका बसवाहकाने म्हटलंय.

 

Follow Us