‘मी आतापर्यंत गप्प होतो पण आता…’, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणावर आता आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मी आतापर्यंत गप्प होतो पण आता..., दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2025 | 2:57 PM

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबीयांकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. पैशांसाठी या महिलेला दाखल देखील करून घेण्यात आलं नाही. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे.

तनिषा भीसे असं या मृत महिलेचं नाव आहे. तनिषा भीसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत. रुग्णालयाच्या मनमानीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप तनिषा भीसे यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे रुग्णालयाकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. घडलेल्या या प्रकारानंतर आता रुग्णालय प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता इथून पुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाहीये. दरम्यान या घटनेवर आता भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस?    

दवाखान्यातील बिलाच्या प्रकरणात मी वेळोवेशी विधानसभेत विषय मांडलेला आहे.  मात्र हॉस्पिटलची एवढी मुजोरी कशामुळे चालते हे पाहावे लागेल. आमदारांच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीचा असा मृत्यू होत असेल तर हे दुर्दैव आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी समिती नेमली आहे, ती योग्य कारवाई करेल.

आजपर्यंत आम्ही गप्प होतो, परंतु आमच्या आमदारांच्या  पीएसोबत अशा प्रकारची घटना घडल्यानंतर आता कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे. दरम्यान लॉरेन्स बिश्नोई संदर्भात कुठलंही यावेळी बोलणं झालं नाही, त्यावर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो होतो, लॉरेन्स बिश्नोई संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते म्हणतील तिथे गुन्हा दाखल करणार आहोत, असंही यावेळी सुरेश धस यांनी म्हटलं आहे.