एका घरात 5 बंदुका ठेवा अन् औरंगजेबाच्या कबरीवर…; प्रसिद्ध आमदाराचे खळबळजनक विधान
तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी नांदेडमधील बिलोली येथे वादग्रस्त विधान केले असून महाराष्ट्रातील मदरशांवर बुलडोझर चालवण्याचे आणि औरंगजेबाची कबर उखडण्याचे आवाहन केले आहे.

तेलंगणातील प्रखर हिंदुत्ववादी नेते आणि आमदार टी राजा सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. टी राजा सिंह यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे आयोजित रामनवमीच्या सभेत अत्यंत वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधाने केली आहेत. या सभेतील त्यांच्या भाषणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. राज्याचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी राज्यातील मदरशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना थेट आव्हान केले आहे.
मदरशांवर बुलडोझर चालवण्याचे आवाहन
आमदार टी राजा सिंह यांनी आपल्या भाषणात मदरशांवर निशाणा साधला आहे. आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मदरसे बंद करण्याबाबत जे विधान केले आहे, त्याचे मी समर्थन करतो. मदरशांमध्ये देशविरोधी कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते. जिथे देशद्रोही तयार होतात, असे मदरसे आम्ही चालू देणार नाही. केवळ बंद करून चालणार नाही, तर या अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची गरज आहे, असे टी राजा सिंह म्हणाले.
यावेळी त्यांनी दाऊद इब्राहिम आणि अजमल कसाब यांचा उल्लेख करत खळबळजनक आरोप केले. अजमल कसाबसारखे लोक मदरशातूनच तयार झाले आहेत. तिथे हिंदूविरोधी कारवाया शिकवल्या जातात, असा दावाही टी राजा सिंह यांनी केला.
औरंगजेबाच्या कबरीचा वाद
त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून राजा सिंह यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटते का? मुस्लिम समाज तुम्हाला कधीच मतदान करणार नाही, हे लिहून घ्या, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील हिंदूंना वाटते की औरंगजेबाची कबर उखडून तिथे शौचालय बांधले पाहिजे. जर ही कबर हटवण्यासाठी मावळ्यांची गरज असेल, तर लाखो हिंदू तिथे येण्यास तयार आहेत, असेही विधान टी राजा सिंह यांनी केले.
प्रत्येक घरात पाच-पाच बंदुका असल्या पाहिजेत
यासोबत स्वसंरक्षण आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी आपल्या घरात शस्त्रे ठेवली पाहिजेत, असे आवाहनही टी राजा सिंह यांनी यावेळी केले. घरात शस्त्र ठेवा, घरातील देव्हाऱ्यात शस्त्रे ठेवणे कायदेशीर आहे. ती बाहेर काढून हल्ला करणे गैरकायदेशीर आहे. जर भविष्यात युद्ध झाले आणि शस्त्र नसतील तर तुम्ही काय करणार. तुम्ही शस्त्रांशिवाय कसे लढणार? धर्मासाठी लढणाऱ्यांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल, तिचे आमचे लोकं त्यासाठी मदत करतील. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले तर त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार असले पाहिजेत. एका एका घरात पाच पाच बंदूक असली पाहिजे, असे चिथावणीखोर विधान टी राजा सिंह यांनी म्हटले. बिलोली येथील या सभेनंतर आता राज्यात कायदेशीर आणि राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.