
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे आधीच राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता या सत्कार सोहळ्याला उद्धव ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांची हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांना जेवणाचे निमंत्रणही दिले होते. त्यातच ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे संजय दिना पाटील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता यावर संजय दिना पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील हे शिवसेना सोडून शिंदे गटात जाणार आहेत, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पसरत आहेत. मात्र या केवळ अफवा असून त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण संजय दिना पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सदन मधील झालेल्या कार्यक्रमाला खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. शिवाय त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या जेवणाचे निमंत्रणही स्वीकारले होते. राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने खासदार संजय दिना पाटील यांच्या पक्षांतराला अधिकच बळ मिळाले. त्यामुळे दिल्लीपासून मुंबई पर्यंत अफवा सुरु होत्या.
मात्र ही केवळ अफवा असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे तसेच जेवणाचे निमंत्रण मिळाल्याने आपण त्या ठिकाणी गेलो होतो. त्याचा चुकीचा अर्थ कोणी लावू नये, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले.