Shivsena : शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी चमत्कार ! ठाकरे-शिंदे आले एकत्र, कुठे झाली युती ?

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी चाकणमध्ये ठाकरे व शिंदे गट एकत्र आले. सुरेश गोरे यांच्या पत्नी, मनीषा गोरे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दोन्ही गटाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Shivsena : शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी चमत्कार ! ठाकरे-शिंदे आले एकत्र, कुठे झाली युती ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
Image Credit source: social media
| Updated on: Nov 17, 2025 | 10:40 AM

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी आघाडी आणि युतीत बिघाड झाला आहे. तर काही ठिकाणी उलट्यासुलट्या युती आणि आघाडी होताना दिसत आहे. सख्खे मित्र पक्के वैरी होताना दिसत असून पक्के शत्रू मित्र होताना दिसत आहेत. गेल्या तीन वर्षापासून एकमेकांचं तोंड न पाहणारा शिंदे आणि ठाकरे गटही या निवडणुकीत जवळ आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनीच दोन्ही गटाने युती केली आहे. दोन्ही गटाच्या या दिलजमाईमुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये आनंदाला उधाण आलं आहे. राज्यात कुठेच एकत्र न आलेली ठाकरे अन शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला, स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. त्यामुळे चाकणमध्ये असं कधीच न पहायला मिळालेलं दृष्य दिसत असून या अनोख्या युतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजकारण बाजूला ठेवून दोन्ही गट एकत्र

खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे. यावेळी सुरेश गोरे यांच्या पत्नी, पत्नी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिल्या आहेत. त्या शिंदेंच्या गटाकडून असल्या तरी त्यांचा अर्ज भरताना त्यावेळी शिंदेचे आमदार शरद सोनवणे तर होतेच पण त्यांच्यासोबत तिथे ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे हेही होते. शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातील वैमनस्य जगजाहीर असतानाच, दोन्ही गटाचे आमदार एकाच ठिकाणी उपस्थित असल्याने मोठी चर्चा सुरू झाली.

मात्र यावर आमदार बाबाजी काळे यांनी प्रतिक्रिया देत सर्व काही स्पष्ट केलं आहे. दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे. त्यांची पत्नीच नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे, असं काळे म्हणाले. त्यामुळं ही युती म्हणता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निवडणूक घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळं हा चाकण पुरता तो ही नगराध्यक्ष पदापुरता निर्णय आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत ही आम्ही स्वबळावर लढतोय असेही आमदार बाबाजी काळे म्हणाले.

कणकवलीमध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकत्र येणार, निलेश राणे यांचे संकेत

दरम्यान कणकवली मध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार. निलेश राणे यांनी कणकवली शहर विकास आघाडी सोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. ‘आम्ही युतीसाठी सकारात्मक होतो. काही लोकांना आमच्या सोबत युती करायची नव्हती, नाही झाली आणि काहींना करायची आहे त्याच्यासोबत होणार’ असे म्हणत ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या शहर विकास आघाडीसाठी दिलेल्या निमंत्रणाला निलेश राणे यांनी प्रतिसाद दिला.

सिंधुदुर्गात युती होण्याची शक्यता आता धूसर होत चाललीय. त्यामुळेच जिल्ह्यात आता भाजपा आणि शिवसेना आमनेसामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आज शिवसेनेच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ‘ आम्ही युतीसाठी प्रयत्न केले. राणे साहेबांनी सांगितल्यामुळे आम्ही थांबलो होतो मात्र आतां राणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मैदानात उतरलोय. आमची ताकद मोठी आहे. आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी तीन तारिखला आमचे फटाके पहावेत’ असं थेट आव्हानच निलेश राणे यांनी भाजपाला दिलंय.