Thane News : ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा, बाहेर प्रचंड गर्दी असताना लोकलचे दरवाजे आतून बंद, प्रवाशांत प्रचंड संताप!
ठाणे स्टेशनवरील कल्याणकडे जाणाऱ्या लोकलचा डबा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद ठेवल्याने प्रवाशांचा तीव्र संताप झाला. अनेक विनंत्या करूनही डबा उघडला नाही. या मुजोरपणामुळे एका संतप्त प्रवाशाने बंद दरवाजावर पाणी फेकून निषेध व्यक्त केला. यामुळे फलाटावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, रेल्वे स्थानकांवरील गैरसोयी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. आज सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत असून रेल्वे सेवेचा बोजवारा उडला आहे. त्याच परिणाम संध्याकाळीही दिसत असून रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच आता स्थानकात आलेल्या लोकलचा डबा आतून बंद केल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
ठाणे रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचा मस्तवालपणा समोर आला. संध्याकाळच्या वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सोडली जाते. मात्र आज सकाळी 10 पासूनचे रेल्वेचा प्रचंड गोंधळ, खोळंबा झाला आणि प्रवासी अडकून पडले. रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली. मात्र रेल्वेमधन प्रवाशांना प्रवसाच करता येत नाहीये. कारण विशेष रेल्वे लोकलमधनं प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी लोकलचे डबे आतून बंद केलेले होते.
ठाणे स्टेशनच्या फलाट क्रमांक 2 वरील कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलचा डबा आतून बंद असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. दरवाजा उघडण्यासाठी वारंवार विनंती करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका प्रवाशाने थेट बंद दरवाजावर पाणी फेकून आपला निषेध व्यक्त केला. लोकल रिकामी असूनही प्रवाशांना त्यात चढून प्रवासच करता आला नाही.
ठाणे स्टेशनवर नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर कल्याणच्या दिशेने जाणारी धीमी लोकल उभी होती. ही लोकल बरीच रिकामी होती, त्यामुळे त्यात चढून इच्छित ठिकाणी जाण्याची ठाणे स्थानकावरील प्रवाशांची इच्छा होती. मात्र याच लोकलचे काही डबे बंद होतं, त्यांचे दरवाजे आतून लावण्यात आले होते. लोकलचा डबा आतून बंद असल्यामुळे फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना डब्यात प्रवेश करता आला नाही. यावेळी काही प्रवाशांनी दरवाजा उघडण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे विनंती केली. जवळपास दोन ते तीन मिनिटे विनवणी करूनही दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यामुळे लोकलमध्ये चढण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आणि या परिस्थितीमुळे नाराजी वाढली.
दरवाजा उघडण्यासाठी वारंवार विनंती करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने एका प्रवाशाचा संताप अनावर झाला. संंतपालेल्या या प्रवाशाने बंद दरवाजावर पाणी फेकून आपला निषेध व्यक्त केला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कथित वागणुकीमुळे आता नाराजी व्यक्त होत असून त्यांच्या मुजोरपणामुळे चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील संबंधित फलाटावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.