ओमराजे निंबाळकर नाराज, थेट सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये खासदार ओमराजे यांचा देखील समावेश होता, आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का होता. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होतो. सुरुवातीला ओमराजे यांची भूमिका तळ्यात मळ्यात होती, त्यामुळे काही काळ शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं होतं, मात्र अखेर ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भीमाशंकर येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्जत तालुक्यातील भीमाशंकर येथे टॅरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू आहे. यावरून विरोधकांनी आधीच सरकारची कोंडी केली आहे, या वृक्षतोडीला स्थानिक ग्रामस्थांचा देखील विरोध होत आहे. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी देखील नाराजी व्यक्त करत सरकारला थेट घरचा आहेर दिला आहे.
नेमकं काय म्हणाले ओमराजे?
भीमाशंकरमधील वृक्षतोडीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत होत आहे. अल नीनोच्या संकटाला महाराष्ट्र वृक्षतोडीमुळेच तोंड देत आहे, या परिस्थितीमध्ये झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी शंभर ते दीडशे वर्षे लागतात. त्यामुळे ही वृक्षतोड दुर्दैवी असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. वृक्ष तोडून प्रोजेक्ट उभा करण्यासाठी आधी एक झाड तोडले तर 100 झाडे लावावी आणि मगच वृक्षतोड करून प्रकल्प उभं करावेत, अशी मागणी देखील यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी वृक्षतोडीला विरोधी पक्षांकडून देखील मोठा विरोध होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.
