
ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणार आहे. कारण तब्बल तीन वर्षांनंतर महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात लोकनियुक्त महापौरांच्या निवडीची घोषणा झाली. शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपोळकर-गायकवाड यांनी ठाण्याच्या महापौर पदी नियुक्ती झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पिठासीन अधिकारी म्हणून या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
ठाणे महापालिकेत आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ठाण्याचे महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यामुळे या महापौरपदासाठी महायुतीकडून शर्मिला पिंपोळकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने आणि सभागृहात कोणीही हरकत न घेतल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. याचप्रमाणे उपमहापौर पदी भाजपच्या कृष्णा पाटील यांचीही बिनविरोध वर्णी लागली आहे.
ठाणे महापालिकेतील १३१ नगरसेवकांपैकी शिवसेना शिंदे गटाचे ७५ नगरसेवक आहेत. तर भाजपचे २८ नगरसेवक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ९, एमआयएम ५, ठाकरे गट १ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. ठाण्यात महायुतीकडे महापौर बनवण्यासाठी स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिकता म्हणून उरली होती.
२०२२ मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होती. या तीन वर्षांच्या काळात महापौर आणि उपमहापौर यांची दालने आणि अधिकृत वाहने धूळ खात पडून होती. आज अखेर या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बाहेर निघाल्या आहेत. तसेच ठाण्याच्या संपूर्ण महापालिका मुख्यालयाची सजावट करण्यात आली होती. सध्या प्रवेशद्वारापासून ते सभागृहापर्यंत रेड कार्पेट अंथरण्यात आले होते.
आता नवनियुक्त महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी पदभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला मी सार्थ ठरेन. ठाणे शहरात वाहतूक कोंडी, रस्ते आणि पाणी यांसारख्या अनेक समस्या आहेत. महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा विकास करू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी दिली.
या निवड प्रक्रियेवेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्थानिक आमदार आणि महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर एकनाथ शिंदे यांचे भव्य कट-आउट्स आणि बॅनर लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.