Ambernath – Badlapur: ‘हद्द’ झाली! कुणाला सीमा नकोय, तर कुणाला सीमा हवीय; बदलापूर, अंबरनाथमध्ये प्रभाग रचनेवर जितक्या सूचना तितक्याच हरकती

| Updated on: May 19, 2022 | 10:52 AM

Ambernath - Badlapur: बदलापूर पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर 113 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्यायत.

Ambernath - Badlapur: हद्द झाली! कुणाला सीमा नकोय, तर कुणाला सीमा हवीय; बदलापूर, अंबरनाथमध्ये प्रभाग रचनेवर जितक्या सूचना तितक्याच हरकती
बदलापूर, अंबरनाथमध्ये प्रभाग रचनेवर जितक्या सूचना तितक्याच हरकती
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अंबरनाथ: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला (state election commission) दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचं काम सुरू केलं आहे. नागरिकांकडून हरकती आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. अंबरनाथ (ambernath) आणि बदलापूर नगरपरिषदेनेही हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. मात्र, नागरिकांचा त्याला अल्पसा प्रतिसाद मिळाला आहे. यात नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत. त्यातही आपल्या मतदारसंघाच्या सीमेशी निगडीत या हरकती आणि सूचना आहेत. काहींना अमूक विभाग आल्या मतदारसंघात हवा आहे, तर काहींना अमूक विभाग आपल्या मतदारसंघात नकोय. काहींचा नव्याने आखण्यात येत असलेल्या सीमेला विरोध आहे. तर काहींना नव्याने आखण्यात आलेली सीमा योग्य वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बदलापूर पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर 113 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्यायत. या हरकतींवर 20 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुनावणी होणार आहे. बदलापुर पालिकेची मुदत संपल्यामुळे मागील तीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी 10 मार्च रोजी बदलापूर पालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला होता. मात्र या आराखड्यावर हरकती आणि सूचना होण्यापूर्वीच प्रभाग रचना जाहीर करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारकडे गेले आणि निवडणुकीचा कार्यक्रम थंडावला.

हे सुद्धा वाचा

बदलापूरात 113 हरकती आणि सूचना

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने आठवडाभरात निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सरकारला दिल्यानंतर 10 मार्चला बदलापूर नगर परिषदेने हा आराखडा प्रसिद्ध केला. या आराखड्याबाबत हरकती आणि सूचना पालिकेनं मागवल्या. 9 मे ते 14 मे पर्यंत शहरातील नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या 5 दिवसात बदलापूर शहरातील नागरिकांनी 113 हरकती आणि सूचना पालिकेकडे सादर केल्या आहेत. या हरकती आणि सूचनांवर 20 मे रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार असल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिलीय.

अंबरनाथ नगरपरिषदेत 64 हरकती

अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर 64 हरकती दाखल करण्यात आल्यायत. या हरकतींवर 20 मे रोजी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेची मुदत संपल्यानं गेल्या 2 वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळं 10 मार्च रोजी अंबरनाथ पालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला होता. यावर हरकती सूचना सादर होऊन सुनावणी होण्यापूर्वीच प्रभाग रचना जाहीर करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारकडे गेले. त्यामुळं पुन्हा काही दिवस निवडणुकीचा कार्यक्रम थंडावला.

6 जून रोजी अंतिम प्रभाग रचना

मात्र सर्वोच्च न्यायालयानं रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर राज्यातल्या 207 नागरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये पुन्हा प्रारूप आराखडा न तयार करता पूर्वीच्याच प्रारूप आराखड्यावर सूचना आणि हरकती मागवण्यासाठी 10 ते 14 मे ही मुदत देण्यात आली. या कालावधीत अंबरनाथमधील नागरिकांनी 64 हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर आता 20 मे रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर 30 मे पर्यंत अहवाल सादर करणे आणि 6 जून रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे असा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलाय, अशी माहिती अंबरनाथ नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांनी दिली. मात्र या सगळ्यानंतर पालिकेच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार? लांबणीवर पडणार? हे पाहावं लागेल.