बदलापूर अत्याचार प्रकरण, आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी खाजगी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही जप्तीची नोटीस लावली आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरण, आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस
आरोपी अक्षय शिंदे
| Edited By: | Updated on: Jan 20, 2025 | 8:46 PM

मयुरेश जाधव, Tv9 प्रतिनिधी, ठाणे : बदलापुरातील प्रसिद्ध शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस बजावली आहे. अक्षय शिंदे यांचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खाजगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाल्याने बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले. त्यांना कोणताही कामधंदाही नसल्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. त्यामुळेच आता या बँकेने त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस लावली आहे.

जना स्मॉल फायनान्स बँकेकडून 4 डिसेंबर 2024 रोजी ही नोटीस लावण्यात आली आहे. नोटीस लावल्यापासून ६० दिवसात थकीत २ लाख १६ हजार रुपये रकमेचा भरणा करा, अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेलं त्यांचं घर ताब्यात घेऊन जप्त केलं जाईल, असा या नोटीसमध्ये उल्लेख आहे. या नोटीसची मुदत ४ फेब्रुवारीपर्यंत असून तोपर्यंत या रकमेचा भरणा केला जातो का? हे आता पाहावं लागणार आहे.

अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणात पोलीस दोषी?

दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणात आज महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. न्यायालयीन चौकशीचा अहवाल आज हायकोर्टात सादर करण्यात आला त्या अहवालात ५ पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे.  अक्षय शिंदे याचा एन्काउंटर नसून हत्या केली असल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे. याच प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. या प्रकरणी आता पोलिसांवर कारवाई होते का? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.