प्रवाशांचा महाखोळंबा… पनवेल, तळोजा ते दिवापर्यंत प्रवाशांचा संताप, रेलरोकोही; काय घडलं?

| Updated on: Oct 01, 2023 | 10:35 AM

पनवेल येथे अगदी थोडक्यात मोठा अनर्थ होता होता टळला आहे. एक मालगाडी घसरली. पनवेल आणि कळंबोली दरम्यान हा प्रकार घडला असला तरी पनवेल ते तळोजापासून दिवा स्थानकापर्यंत या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांना संताप अनावर झाला आहे.

प्रवाशांचा महाखोळंबा... पनवेल, तळोजा ते दिवापर्यंत प्रवाशांचा संताप, रेलरोकोही; काय घडलं?
Goods Train Derailment
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश थोरात, सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 1 ऑक्टोबर 2023 : प्रवाशांसाठी आजचा दिवस अत्यंत धकधकीचा आणि मनस्तापाचा ठरला आहे. पनवेल येथे मोठा अपघात होता होता टळला आहे. पनवेलमध्ये एका मालगाडीतील अवजड सामान कोसळल्याने ही मालगाडी रुळावरून घसरली. सुदैवाने आजूबाजूच्या ट्रॅकवरून कोणतीही गाडी धावली नसल्याने मोठा अपघात टळला आहे. तर, ही मालगाडी घसरल्याने कोकणासह इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा उडाला आहे. कोकणात जाणारी गाडीच आली नसल्याने दिवा येथे तर प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून रेलरोकोही केला आहे.

पनवेल जवळ काल रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी मालगाडी घसरली. या मालगाडीतील अवजड सामान खाली कोसळलं. ही मालगाडी छोटे रॉड घेऊन चालली होती. हे रॉड मालगाडीतून घसरले. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली आणि खांबही कोसळले. त्यामुळे मालगाडी घसरली. रात्री 12 वाजल्यापासून पनवेल ते कळंबोली दरम्यान ही मालगाडी थांबलेली आहे. त्यामुळे पनवेल ते कळंबोली दरम्यानची संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा इतर रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.

सध्या हे रॉड बाजूला हटवण्याचं आणि खांब पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. मालगाडीही बाजूला हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी कामगारांची फौजच रेल्वे रुळावर उतरवण्यात आली आहे. सुदैवाने आज रविवार असल्याने आधीच कमी प्रमाणात गाड्या चालविल्या जातात. इतर दिवशी हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

तुतारी एकाच जागी खोळंबली

पनवेल आणि कळंबोली दरम्यान मालगाडी घसरल्याचा परिणाम एक्सप्रेस गाड्यांवरही झाला आहे. या दुर्घटनेमुळे पहाटे 4 वाजल्यापासून तुतारी एक्सप्रेस तळोजा रेल्वे स्थानकात थांबून आहे. रात्री 12 वाजता ही तुतारी एक्सप्रेस दादरहून निघाली होती. मात्र, ती तळोजालाच थांबली आहे.

तुतारी एक्सप्रेस कोकणात जाते. या एक्सप्रेसमधून हजारो चाकरमानी कोकणात जातात. मात्र आता हीच एक्सप्रेस खोळंबळल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. या प्रवाशांना पहाटे 4 वाजल्यापासून एकाच जागी बसून राहावे लागत आहे. एक्सप्रेस का थांबली? ती कधी निघणार? याची काहीच माहिती दिली जात नाहीये. त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे.

रेलरोको

दुसरीकडे या दुर्घटनेमुळे दिवा ते सावंतवाडी गाडी दिव्यात आली नाही. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी दिवा स्टेशनवर आलेले प्रवाशी संतापले आहे. अख्खी रात्र गेली तरी गाडी आली नसल्याने या प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. या प्रवाशांनी अखेर रेल्वे रुळावर उतरून प्रचंड निदर्शने केली. समोरून येणाऱ्या एक्सप्रेस आणि लोकल गाड्या अडवून रेलरोको केला आहे. महिलांनीही रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे. एकाचवेळी शेकडो प्रवाशी रेल्वे रुळावर उतरल्याने अखेर आरपीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांची समजूत काढून त्यांना परत स्टेशनवर जाण्यास सांगितलं आहे.

एक्सप्रेस रद्द

कोकणात जाणाऱ्या गाडीत 15 ते 16 तासापासून प्रवासी बसून आहेत. गाडी जागची हालत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. तर दिवापासून कोकणाकडे जाणाऱ्या काही गाड्यांचा मार्ग वळवण्यात आला आहे तर काही गाड्या रद्द केल्या आहेत.