
कल्याण डोंबिवलीतील (KDMC) रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. त्यामुळे खड्डे (Potholes) प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी वारंवार केली जाते. मात्र या मागणीकडे पालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतेय. अशातच आता खड्ड्यांविरोधात डोंबिवलीतील रिक्षावाल्यांनी (Auto rikshaw) आक्रमक पवित्रा घेतलाय. खड्ड्यांविरोधात एकीकडे नागरिकांमध्ये संतापाची लाट असताना दुसरीकडे आता रिक्षावाल्या दादांची सटकली आहे. खड्डयांच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात रिक्षाचालकांनी गोंधळ घातलाय. आधी खड्डे बुजवा मग स्वच्छता अभियान राबवा, असं रिक्षाचालकांच म्हणणं आहे. डोंबिवली पश्चिमेत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत गोंधळ घालत ही मोहीम रिक्षाचालकांकडून थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे आता यावर काय तोडगा काढला जातो? याकडे कल्याण डोंबिवलीकरांचं लक्ष लागलंय.
कल्याण डोंबिवली म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते खड्डे! या खड्डयांनी नागरिकांच्या डोळ्यात तर पाणी आणलंच. पण रिक्षाचालकांना देखील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी शहर स्वचछता अभियान सुरू केले आहे.
या अभियाना अंतर्गत डोंबिवली पश्चिम परिसरात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर झाडू मारत स्वच्छता अभियान सुरू होतं. या दरम्यान संतप्त रिक्षा चालकांनी या अभियानाला विरोध केला. रिक्षा चालकांनी गोंधळ घालत खड्डे भरण्याला प्राधान्य देण्यापेक्षा झाडू मारून कचरा उचलणं जास्त महत्वाचे आहे का? असा सवाल केलाय.
आधी खड्डे भरा नंतर स्वच्छता मोहीम राबवा, असा सूचक इशारा रिक्षावाल्यांनी यावेळी दिला. अन्यथा आम्ही या मोहिमेला रस्त्यावर उतरून विरोध करू, असा म्हणत रिक्षा चालकांनी प्रशासनाला ठणकावत स्वच्छता मोहीमचे कामही रोखलं.
इतकंच नाही तर हे अभियान सुरू असताना केवळ फोटोसेशन केलं जातं असल्याचा आरोपही करण्यात आला. वारंवार निवेदनं देऊनही कोणताही उपयोग होत नाही, आमचं पोट आम्हाला भरायचं आहे, फक्त खड्डे बुजवून आम्हाला दिलासा द्या, इतकीच आमची मागणी आहे, असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे.