मरावे परी किर्तीरूपी उरावे, हे काम केल्याने पालकांचे होतेय पंचक्रोशीत कौतुक

| Updated on: May 19, 2023 | 9:42 PM

मात्र दुर्दैवानं तिथेही सर्पदंशावरील उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं.

मरावे परी किर्तीरूपी उरावे, हे काम केल्याने पालकांचे होतेय पंचक्रोशीत कौतुक
Follow us on

निनाद करमरकर, प्रतिनिधी, उल्हासनगर : मुरबाड तालुक्यातील टोकावडेजवळ असलेल्या फांगळोशी गावात फनाडे कुटुंबीय वास्तव्याला आहे. या कुटुंबातील संदेश फनाडे हा १३ वर्षांचा मुलगा आज सकाळी घराच्या ओसरीत बसलेला होता. तेवढ्यात त्याला विषारी नागाने दंश केला. ही बाब लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला आधी जवळच असलेल्या धसई गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र तिथे सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला टोकावडे इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं.

सर्पदंशावर उपचार उपलब्ध नव्हते

मात्र दुर्दैवानं तिथेही सर्पदंशावरील उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं. टोकावडे ते उल्हासनगर हा जवळपास ५० किलोमीटरचा प्रवास करून हे कुटुंब संदेशला घेऊन उल्हासनगरला दाखल झालं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

 

हे सुद्धा वाचा

डोळे दान करण्याचा निर्णय

संदेशला तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मात्र यानंतरही खचून न जाता पुत्रवियोगाचं दुःख बाजूला सारत फनाडे कुटुंबीयांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांचा मृत मुलगा संदेश याचे डोळे दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांच्या सहाय्याने संदेशचं नेत्रदान करण्यात आलं.

दोन नेत्रहिनांना मिळेल दृष्टी

आमचा मुलगा तर गेला. मात्र किमान त्याचे डोळे जीवंत राहतील. त्यातून दोन नेत्रहिनांना दृष्टी मिळेल, अशी भावना संदेश याचे काका नरेश पन्हाळे यांनी व्यक्त केली. मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर बनसोडे यांनीही फनाडे कुटुंबीयांच्या या निर्णयाचं कौतुक केलं.

आरोग्य कर्मचाऱ्यांना आले गहिवरून

पुत्रवियोगाचे दुःख बाजूला ठेवत मुरबाडमधील पालकांनी आपल्या चिमुकल्याचं नेत्रदान केलंय. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पालकांनी घेतलेल्या या निर्णयानं उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आलं. या पालकांच्या निर्णयाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.