
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एक वेगळच समीकरण आकाराला येत आहे. त्याची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या दुराव्याची सुरुवात तर नाही ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण केडीएमसी महापालिकेत उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. पण आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केडीएमसीमध्ये सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत युतीमध्ये निवडणूक लढवली. पण निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन केलं. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत तेच घडताना दिसत आहे.
केडीएमसीमध्ये मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यायचा जो निर्णय घेतलाय, त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले की, “तिथल्या स्थानिक नेतृत्वाला राज साहेबांनी अधिकार दिले आहेत. तिथली राजकीय परिस्थिती, राजकीय गणितं यावर स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतला”
साहेबांनीच त्यांना अधिकार दिले आहेत
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा हा निर्णय घेतला का? त्यावर कदाचित हा विचार करुन स्थानिक नेतृत्वाने असा निर्णय घेतला असावा असं देशपांडे म्हणाले. राज ठाकरे यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत का? साहेबांनीच त्यांना अधिकार दिले आहेत असं उत्तर दिलं. विकासासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहोत ही मनसेची भूमिका आहे.
भाजपची भूमिका काय?
भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन या पाठिंब्यासंदर्भात म्हणाले की, “महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवली. मनसेने पाठिंबा दिला तर स्वागतच आहे. मनसे हिंदुत्ववादी विचारांची पार्टी आहे. महाराष्ट्रात भाजप महायुतीचा झेंडा फडकणार” “विधानसभेला आम्ही सोबत होतो. मनसे हिंदुत्ववादी विचारांची पार्टी आहे. त्या विचारधारेवर महायुतीला पाठिंबा देत असतील, तर वाईट वाटण्याचं कारण नाही” असं नवनाथ बन म्हणाले.