
Thane Massive Traffic Jam : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रस्त्यावर पडलेले खड्डे, कोलमडलेली सिग्नल यंत्रणा आणि टोलनाके यामुळे ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्यातील तीन हात नाका, आनंद नगर, जकात नाका, मुलुंड टोल नाक्यापासून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यांचा लेट मार्क लागणार आहे.
ठाण्यातील अनेक मार्गांवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सध्या पूर्व द्रुतगती महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातील तीन हात नाका, आनंद नगर जकात नाका, मुलुंड टोलनाका या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर मुलुंड टोलनाक्यापासून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूकही मंदावली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांकडून शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
ठाण्यात झालेल्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका नोकरदार वर्गांना बसला आहे. अनेक कर्मचारी हे या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लेट मार्क लागणार आहे. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून अनेक कर्मचारी ही वाहतूक कोंडीत अडकले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे, सिग्नल यंत्रणा आणि टोलनाक्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर या मेट्रो शहरात राहणाऱ्या नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून या वाहतूक कोंडीवर लवकरच काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.