
निखिल चव्हाण, ठाणे : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. एकिकडे रोशनी शिंदे यांना पुढील उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलंय तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या महामोर्चाला अखेर ठाणे पोलिसांची परवानगी मिळाली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात ठाण्यात आज पोलीस आयुक्तालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला जाणार असून पोलिसांनी या प्रकरणी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच काल गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे आजच्या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागंलय.
रोशनी शिंदे यांना सोमवारी काही महिलांनी मारहाण केली. या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या, असा आरोप रोशनी शिंदे यांनी केला आहे. मात्र या प्रकरणात अद्याप ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. यावरून संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली. हे फडतूस गृहमंत्री आहेत, असे शब्द वापरले. यावरून देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या दिग्गजांनी प्रत्युत्तर दिले. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरलाय.
दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील महामोर्चाला ठाणे पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. त्यापूर्वी पुढील अटींसह एकूण १७ अटी घालण्यात आल्या आहेत.
सोमवारी रात्री रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. शिंदे यांना मारहाणीच्या जखमा आहेत तसेच त्यांना काही ठिकाणी मुका मार लागल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली होती. आज पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात हलवण्यात आलंय.