Thane Water Pollution: ठाणेकर पित आहेत विषारी पाणी! सरकारच्या अहवालात धक्कादायक खुलासा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे आणि भूजलाचे नमूने तपासून पाणी प्रदूषणाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील पिण्याच्या पाण्याचा दर्जा खालावत असल्याची कबुली केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

ठाणे, पाणी हे जीवन आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळविणे हा प्रत्येकाचाच अधिकार आहे मात्र ठाण्याच्या (Thane Water) बाबतीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणचे पाणी सर्वाधिक प्रदूषित (Pollution) असल्याची बाब समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे आणि भूजलाचे नमूने तपासून पाणी प्रदूषणाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील पिण्याच्या पाण्याचा दर्जा खालावत असल्याची कबुली केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. पिण्याच्या पाण्याबाबत सरकारने राज्यसभेत दिलेली आकडेवारी धक्कादायकच नाही तर अत्यंत चिंताजनक आहे. देशातील सर्व राज्यांतील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भूगर्भातील पाण्यामध्ये विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक विषारी धातू आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोकांना, म्हणजेच दहा पैकी आठ जणांना जमिनीतून पाणी मिळते.
भूजलातील घातक धातूंचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ते पाणी ‘विष’ बनते. भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या खेड्यांमध्ये असल्याने आणि तेथे हातपंप, विहिरी, नद्या, तलाव यातून थेट पाणी मिळत असल्याने ही समस्या अधिक गंभीर आहे.
सर्वाधिक प्रदूषित नदीमध्ये तापी नदीचा समावेश
अहवालानुसार ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणचे पाणी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर महाराष्ट्रात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नाशिकमधील अनेक ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्यात तापी नदीनंतर विदर्भात वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या प्रदूषित आहेत. त्याचबरोबर मुंबईत मिठी, पुण्यातील मुळा-मुठा, ठाण्यातील उल्हास, कोल्हापुरात पंचगंगा या नद्या प्रदूषित आहेत. कोल्हापुरात साखर कारखाने आणि विशेषतः इचलकरंजीतील वस्रोद्योगामुळे पंचगंगेचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे.
विषारी धातूंचे वाढते प्रमाण
देशात 209 जिल्ह्यांत भूजलामध्ये प्रति लिटर 0.01 मिलीग्रॅमपेक्षा जास्त आर्सेनिक आढळून आले. 491 जिल्ह्यांत भूजलातील लोहाचे प्रमाण प्रति लिटर एक मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. 11 राज्यांतील 29 जिल्ह्यांमध्ये भूजलातील कॅडमियम 0.003 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा अधिक, तर 16 राज्यांतील 62 जिल्ह्यांतील काही भागांमध्ये क्रोमियमचे प्रमाण 0.05 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त आहे. 152 जिल्ह्यांत भूजलात 0.03 मिलीग्रॅम प्रति लिटर युरेनियम जास्त आहे.
