कल्याण डोंबिवलीकरांची उत्कंठा शिगेला, अर्थसंकल्पाच्या पोतडीतून आज काय निघणार?

| Updated on: Mar 23, 2023 | 10:28 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वर्चस्वाखालील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होतोय. त्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांचं विशेष लक्ष या बजेटकडे आहे.

कल्याण डोंबिवलीकरांची उत्कंठा शिगेला, अर्थसंकल्पाच्या पोतडीतून आज काय निघणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सुनिल जाधव, कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प (Budget) सादर होतोय. त्यामुळे नागरिक आणि विशेषतः करदात्यांच्या नजरा आजच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी मिळण्याची अपेक्षा इथल्या नागरिकांना आहे. मागील तीन वर्षे करोनामुळे महापालिकेने आरोग्यावर सर्वाधिक खर्च केला. त्यामुळे शहरातील इतर समस्या आणि नागरिकांच्या सुविधांकडे काहीसं दुर्लक्ष झालं. आता यावर्षी नागरिकांसाठी कोणत्या नव्या संकल्पना आणि सुविधा दिल्या जाणार आहेत. याकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.

अर्थसंकल्पाच्या पोतडीतून काय निघाणार?

महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पोतडीतून नेमके काय निघणार हे पुढील काही तासात कळणार आहे. अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला कल्याण डोंबिवली महापालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज मांडला जातोय. मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांना हा अर्थसंकल्प सादर करतील. पालिकेच्या महासभा सभागृहात हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

निधीचा अभाव?

आरोग्य, कचरा, शिक्षण, आणि विकास कामे यावर भर असणारा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी अपेक्षा आहे. मागील तीन वर्षात पालिकेच्या तिजोरीत निधी नसल्याचे कारण देत नगरसेवक निधीसह विकास निधीची कामे देखील रोखण्यात आली होती. यामुळे प्रभागातील अनेक विकास कामाना खीळ बसली आहे. सध्या आमदार आणि खासदार निधी आणि एमएमआरडीएसह राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून शहरात रस्ते, मल वाहिन्या, जल वाहिन्या, अमृत योजनेतून कामे सुरु आहेत. मात्र पालिकेच्या अर्थसंकल्पातून फारशी कामे झालेली दिसत नाहीत. यामुळे यंदा पालिका प्रशासन करदात्या नागरिकांना कोणत्या सुविधा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांची कृपा होणार?

ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं वर्चस्व आहे. येथील ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथेही शिंदेंचा प्रभाव दिसून येतो. आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीकरांच्या आशा उंचावल्या आहेत. या महापालिकांची अर्थसंकल्पातील स्थिती भक्कम करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु असल्याची चर्चा होती. त्यातच निधीअभावी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडून नागरिकांना मोठी आशा आहे.

कचऱ्याचा प्रश्न गंभीर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कचऱ्याचा प्रश्न अद्यापही जसे तेच आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड ची क्षमता संपल्याने हे डम्पिंग ग्राउंड बंद करत पालिकेने उंबर्डे येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. मात्र याठिकाणी देखील क्षमतेपेक्षा जास्त कचरा आणून टाकला जात असल्यामुळे येथे कचऱ्याचा नवा डोंगर निर्माण होत आहे उंबर्डे कचरा प्रकल्पाला वारंवार आगी लागण्याच्या देखील घटना घडत आहेत यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कचरा विल्हेवाटीसाठी पालिका प्रशासन काय उपाययोजना राबवते हे पहावे लागेल.