शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, फडणवीसांचं मोठं विधान, म्हणले 2024 मध्येच…
सध्या शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. यावर आता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सध्या शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला, दरम्यावर यावर प्रतिक्रिया देताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. पण त्यापूर्वी लोकन्यायालयाने हा निर्णय 2024 साली विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिला आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आणि राष्ट्रवादी ही अजित पवार यांची आहे, यावर लोकन्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वाचं लक्ष आहे, परंतु सुप्रीम कोर्ट देखील हाच निर्णय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र शिवसेना ही कालही, आजही आणि उद्याही उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे, तसेच राष्ट्रवादी ही कालही आजही आणि उद्याही शरद पवार यांचीच असणार आहे, असं विधान केलं आहे. जर एखाद्याचं मत वेगळं असेल तर त्यांनी राज ठाकरे यांच्या सारखी वेगळी चूल मांडायला हवी, स्वत:च्या हिंमतीवर पक्ष निर्माण केला तर सर्वजण त्याच कौतुकच करतील असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.
सुप्रीम कोर्टात सुनावणी
दरम्यान शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाला द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव हे शिवसेना शिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती, या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला.