Omraje Nimbalkar : राजकीय बोलणं थोडं आपण बाजूला ठेऊ आणि..मुख्यमंत्री धाराशिवमध्ये येण्याआधी ओमराजे निंबाळकर यांचं महत्वाचं वक्तव्य
Omraje Nimbalkar : "शनिवारपर्यंत दुष्काळासंदर्भाता अधिसूचना जारी होईल. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना ज्या सवलती मिळतात, त्या मिळतील.विरोधी पक्षातले लोक काय म्हणतात, सरकारी पक्षातले काय म्हणतात यापेक्षा शेतकऱ्याला मदत मिळणं गरजेचं आहे"

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील काही गावांची पाहणी करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिवमध्ये येण्याआधी ओमराजे निंबाळकर यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या केल्या आहेत. “इतका भीषण दुष्काळ सरकार, आपल्यासमोर आवासून उभा आहे. आता सप्टेंबर महिना चालू आहे. पावसाळा संपण्याआधीच बोअर, विहिरी यांचं अधिग्रहण करावं लागतय. बऱ्याच गावातून टँकरची मागणी होतेय. इतकी भीषण परिस्थिती पावसाळासंपण्याआधी कधी कुठल्या गावाने पाहिलेली नाही. ती भीषण परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव अनुभवत आहे. ओला दुष्काळ असेल तर शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडतं. आता इथे परिस्थिती उलट आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी पैसे खर्च केले होते. चांगलं पीक आलं होतं, फुलोऱ्यात होतं. त्याचवेळी पावसाने ओढ दिली. हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून गेला आहे. शून्य टक्के उत्पादन होणार आहे. 20 ते 25 हजार रुपये एकरी खर्च केलेत” असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.
“आज मुख्यमंत्री येणार आहेत. माझ्याच लोकसभा मतदारसंघातील गावं आहेत. प्रत्येक गावात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीची पाहणी करणार आहेत. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर भीषणता त्यांच्या लक्षात येईल. इथून पुढे आठ महिने काढायचे आहेत. आठ महिन्यात सरकारकडून भरीव मदत होणं गरजेचं आहे. राजकीय बोलणं बाजूला ठेऊ. पण शेतकरी अडचणीत आहे. हेक्टरी 50 हजार, एक लाख रुपयांची मदतही कमी पडेल अशी भीषण परिस्थिती आहे. सरकार पाठीशी आहे हा संदेश जाणं गरजेचं आहे. कर्जमाफिची घोषणा केली, ते कर्जमाफीचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले पाहिजेत. परत शेतकऱ्यासाठी कर्जाची व्यवस्था केली पाहिजे. जिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे तिथे नियोजन केलं पाहिजे. जो शेतकरी जनावरांवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे” अशा मागण्या ओमराजे निंबाळकर यांनी केल्या.
राजकीय भाष्य करण्यापेक्षा वस्तूस्थिती पाहणं गरजेच
“शेतकऱ्याच्या बाबतीत बँकांनी सुद्धा मानवतेने विचार केला पाहिजे. त्यांना नोटिसा पाठवू नये. कुठल्याही बँकेची नोटीस आली तर मी 24 तास फोनवर उपलब्ध आहेच. बँकांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून पहावं. शेतीतून उत्पादन शून्य आहे. शेतकऱ्याचा लेकराचा, प्रपंचाचा खर्च आहे. प्रतिकुल परिस्थिती आहे.कर्जाची वसुली तातडीने थांबवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेतील फि मध्ये सवलत मिळाली पाहिजे. सर्वांना मिळून आवाहन पेलाव लागणार आहे. राजकीय भाष्य करण्यापेक्षा वस्तूस्थिती पाहणं गरजेच आहे” असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.