Manoj jarange Patil : मुख्यमंत्र्यांनी प्रेस समोर येऊन शब्द द्यावा, जरांगे पाटील यांची सरकारी शिष्टमंडळासोबत चर्चेमध्ये मोठी मागणी
Manoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने आज पहाटे भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली

मागच्या अनेक दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने आज पहाटे भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. उपोषण मागे घ्यावं अशी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना विनंती केली. “गॅझेटियरची अंमलबजावणी जीआर काढून काढावीच लागेल. 58 लाख नोंदी कमी होणार नाही हे लेखी द्यावं लागेल. पुन्हा-पुन्हा तोच तोच घोळ नको. 58 लाख नोंदी, त्यांचं वाटप करणं वॅलिडिटी देण्यासंदर्भात लेखी द्यावं. मुख्यमंत्री साहेब असतील त्यांनी प्रेस समोर येऊन शब्द द्यावा” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. “सातारा संस्थानचा गॅझेट लागू करण्यासाठी सरकारला 3 महिन्यांना वेळ द्यावा लागेल. नोंदीवर मुख्यमंत्र्यांची सही असावी. मराठा समाजाला वेड्यात काढू नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात सरकार प्रयत्नशील आहे असं विखे पाटील यांनी सांगितलं. “58 लाखातील एकही नोंद कमी होणार नाही याची खात्री हवी. त्यावर मुख्यमंत्र्यांची सही असावी. दुसरं हैदराबाद गॅझेट नावानुसार, संख्येनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन वॅलिडिटी द्यावी लागेल. आजच्या पुढं मराठ्याला वेड्यात काढू नका. वेळ मारुन नेण्याचा प्रकार करु नका” असं जरांगे पाटील बोलले. “9 सप्टेंबरला जीआर काढला. वैश्यवाणी समजाला सरकारने आरक्षणात घेतलं.त्यांच्यासाठी जसा जीआर काढला, त्या धर्तीवर मराठा समाजासाठी तुम्ही असा जीआर का काढू शकत नाही?” असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. “माळी समाज कशावरुन गरीब आहे? गावच्या पायथ्याला त्यांचे मळे आहेत. त्यांना द्या, नाही म्हणत नाही आम्ही. पण त्यांना एक न्याय, आम्हाल एक असं का” असा प्रश्न जरांगेंनी विचारला. मनोज जरांगेंनी सरकारी शिष्टमंडळासोबत चर्चा करताना अन्य समाजाला दिलेल्या आरक्षणाचे दाखले दिले.
पाच टक्के मराठा श्रीमंत असले म्हणून काय झालं?
“स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात होता. तुम्ही आधी तेलंगण,आंध्रात जा तिथल्या मराठ्यांना विचारा तुम्हाला आरक्षण आहे का? तुम्हाला व्यवस्थित काम करावं लागेल तरच आम्ही तुमच ऐकू. आंदोलनापुरता इथे येणार आणि पुन्हा सोडून देणार हे पुन्हा नाही होणार. तुम्ही समजून घ्या, तुमचा अवमान, अहवेलना मी करत नाहीय” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “इथे गरीबाची पोरं नाही का? पाच टक्के मराठा श्रीमंत असले म्हणून काय झालं? इतर गरीब नाहीत का?” असे प्रश्न जरांगेंनी शिष्टमंडळाला विचारले.
“आता माझ्या आंदोलनाच्या काळात गिरीश भाऊ गिरीश महाजनांनी 56 जाती आरक्षणात घातल्या. त्यांची मागणी पण नव्हती. आता आरक्षण सुरु असताना ही पण जात घातली. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात होता. त्यानंतर मराठे सोडून सर्व अन्य जाती जशाच्या तशा आरक्षणात घेतल्या.1901 च्या जनगणनेची नोंद आहे. 1884 चं गॅझेट आहे” असं जरांगे पाटील म्हणाले.