
पुण्याजवळच्या प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादहून आलेल्या एक पर्यटक तानाजी कड्यावरून पाय घसरून खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौतम गायकवाड (२४) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा साताऱ्याच्या फलटण येथील आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. सध्या पोलिस आणि बचाव पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गायकवाड आपल्या चार मित्रांसोबत हैदराबादहून पुणे आणि आसपासच्या ठिकाणी फिरण्यासाठी आला होता. हे सर्व मित्र बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सिंहगड किल्ल्यावर पोहोचले. संध्याकाळच्या वेळी ते तानाजी कड्याच्या दिशेने गेले. त्यावेळी गौतमने मित्रांना लघुशंकेसाठी जातो असे सांगितले आणि तो थोड्या अंतरावर गेला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याचा शोध सुरू केला.
यानंतर जवळच असलेल्या हवा पॉइंटजवळ गौतमची चप्पल सापडली. मात्र, तो कुठेही दिसला नाही. यामुळे घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ १०० नंबरवर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पीएसआय दिलीप शिंदे आणि त्यांच्या टीमला घटनास्थळी पाठवले. हवेली आपत्ती व्यवस्थापन, मावळा जवान संघटना आणि वनविभागाचे कर्मचारी देखील मदतीसाठी आले.
सिंहगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस आणि वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे, वाऱ्याचा वेग आणि निसरड्या जमिनीचा अंदाज न आल्याने गौतमचा पाय घसरून तो दरीत कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बचाव पथकाने रात्री उशिरापर्यंत गौतमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे त्यांना शोधकार्य थांबवावे लागले. गुरुवारी सकाळी सहा वाजता पुन्हा एकदा बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप गौतम सापडलेला नाही. त्यामुळे या घटनेमुळे सिंहगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गौतम सुखरूप मिळावा, यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.