
Borivali Viral Video : बोरिवलीमध्ये तिकिटावरून प्रवासी आणि टीसीमध्ये वाद झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या वादानंतर प्रवासांनी टीसीच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. या सर्व दादागिरीचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणात जीआरपीने प्रवाशाला अटक केली असून पुढली चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका प्रवाशाने बोरिवली रेल्वे स्थानकावर असलेल्या टीसीच्या कार्यालयात जाऊन एका प्रवाशाने तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव राहुल सुनिल रसाळ असे आहे. तो त्याच्या महिला मैत्रिणीसोबत जीवदानीला जाण्यासाठी रेल्वेने निघाला होता. त्यानेच रागाच्या भरात टीसीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार राहुल रसाळ याच्याकडे लोकलच्या दुसऱ्या वर्गाचे तिकीट होते. मात्र तो पहिल्या वर्गाच्या डब्यात बसला होता. त्याच्यासोबत यावेळी त्याची महिला मैत्रिणही होती. तसेच एक अल्पवयीन मुलगा होता ज्याच्याकडे तिकीट नव्हते. प्रथम वर्ग डब्यात टीसी लोकांना तिकीट दाखवा अशी विचारणा करतात. तसा अधिकार त्यांना दिलेला आहे.
राहुल याच्याकडेही टीसीने लोकलच्या प्रथम वर्गाचे तिकीट आहे का असे विचारले. तपासणीत राहुलकडे दुसऱ्या वर्गाचे तिकीट असल्याचे समोर आले. तसेच अल्पवयीन मुलाकडेही तिकीट नव्हते. हा प्रकार समोर आल्यानंतर टीसीने प्रवाशाला बोरिवली टीसी कार्यालयात आणले. तिथे नियमानुसार दंडाची रक्कम भरण्यास सांगण्यात आले. यावेळी राहुलने मात्र टीसी तसेच टीसी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांशी वाद घातला.
टीसी कार्यालयात आणताच प्रवासी राहुल संतापला. त्याने टीसी ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड करायला सुरुवात केली. कार्यालयातील वेगवेगळ्या वस्तूंची त्याने तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. टीसी कार्यालयात तोडफोड होत असल्याचे समजताच जीआरपी पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी येत बीएनएसच्या कलम 132, 324 (5) अंतर्गत राहुलला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.